जिल्हाधिकाऱ्यांचा रावेरला जनता दरबार : तात्काळ समस्या सोडविण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
दीड महिन्यांनंतर होणार समस्यांची पडताळणी
कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर
नागरिकांच्या समस्या व प्रश्न एकूण घेऊन ते सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी अमन मित्तल आज रावेर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी प्रत्येक नागरिकाची त्यांनी समस्या एकूण घेत या समस्यांचे तातडीने निराकरण कारण्याच्या सुचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी समस्या सोडविल्या किंवा नाही याची पडताळणी दीड महिन्यानंतरच्या दौऱ्यात जिल्हाधिकारी करणार आहेत. समस्याग्रस्त नागरिकांची गर्दी व जिल्हाधिकाऱ्यांकडून नागरिकांचे समस्या सोडविण्याबाबत दिले जाणारे उत्तर नागरिकांचे समाधान करणारे ठरले. एक प्रकारे जिल्हाधिकारी मित्तल यांनी रावेरला जनता दरबार घेतल्याची चर्चा सुरु होती.
केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्या सोडविण्याला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी मित्तल यांनी रावेरला भेट दिली. जिल्हाधिकारी येण्यापूर्वीच समस्या घेऊन आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी तहसील कार्यालयात झाली होती. तहसीलदारांच्या दालनात मित्तल यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी दालनात प्रांताधिकरी कैलास कडलग, तहसीलदार बंडू कापसे, मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे, वन परिक्षेत्राधिकारी अजय बावणे, एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर, बीडीओ डॉ मंजुश्री गायकवाड उपस्थित होते. स्वछता, पाणीपुरवठा, गटार बांधकाम, पीएम किसान योजना या बाबतच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.