नवनियुक्त पोलीस अधिकाऱ्यांसमोर शांतता टिकवून ठेवण्यासह गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान : अवैध धंद्यांना लगाम लागेल का ?
नागरिकांनी कायद्याचे पालन करण्याची गरज
कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर
येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे ३० नोव्हेंबरला सेवानिवृत्त झाल्यानंतर सव्वा तीन महिने येथील पोलीस ठाण्याचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे होता. मात्र तीन दिवसांपूर्वी डॉ विशाल जयस्वाल यांची पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. रावेर हे संवेदन शहर म्हणून पोलीस प्रशासनात नोंद आहे. त्यामुळे शहर व परिसरात कायदा सुव्यवस्था व शांतता टिकवून ठेवण्यासह गुन्हेगारी मोडून काढण्याचे मोठे आव्हान श्री जयस्वाल यांच्यासमोर आहे. तसेच चालणाऱ्या छुप्या अवैध धंद्यांना लगाम लावावा लागणार आहे. वेळीच गुन्हेगारांना ठेचून काढण्याची जबाबदारी नवनियुक्त पोलीस अधिकारी अधिकाऱ्यांवर आहे. दरम्यान शहराची शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचीही गरज आहे.
रावेर तालुका हा विस्ताराने मोठा असल्याने तालुक्यात रावेर, सावदा व निंभोरा या तीन ठिकाणी पोलीस ठाणे कार्यरत आहेत. रावेर शहर हे तालुक्याचे प्रमुख ठिकाण असून येथे अधूनमधून होणाऱ्या अनुचित घटनांनी शहराची संवेदनशील शहर अशी सरकार दप्तरी नोंद आहे. हा तालुका महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर आहे. शहरातून अंकलेश्वर- बऱ्हाणपूर हा महामार्ग व रेल्वेमार्ग गेलेला आहे. मध्यप्रदेशातून चोरवड व पालमार्गे तालुक्यात व जिल्ह्यात येता येते. या दोन्ही मार्गाचा वापर गुन्हेगारांकडून तालुक्यात येण्यासाठी केला जातो. पाल व चोरवड येथे पोलिसांनी वाहनांची कसून तपासणी केल्यास बाहेरील राज्यातून येणाऱ्या गुन्हेगारांना आळा बसेल. याच मार्गाने गुरांची मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक होते. तसेच मध्यप्रदेशातून रावेर मार्गे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी केली जाते. याला रोखण्यासाठी पोलिसांना अधिक सतर्क राहावे लागून आळा घालवा लागणार आहे.
वाहतूक कोंडीचा प्रश्न
शहराच्या मध्यातून अंकलेश्वर-बऱ्हाणपूर हा राज्यमार्ग गेलेला आहे. या महामार्गावर अवजड वाहनसह इतर वाहनांची कायम वर्दळ असते . मात्र वाहनचालकांच्या बेफिकिरी व बेशिस्तपणामुळे नवीन विश्रामगृह ते नाईक महाविद्यालय पर्यंतच्या रस्त्यावर अनेक अपघाताच्या घटना घडून त्यात निरपराध व्यक्तींचा नाहक बळी गेला आहे. येथील डॉ आंबेडकर चौक ते पंचयत समिती दरम्यान रस्त्यावर वाहनाला कट लागणे, धक्का लागणे या कारणावरून बाचाबाचीचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. यातून मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आंबेडकर चौकात वाहतूक पोलीस कार्यरत असतात. त्यांनी या ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवल्यास अशा घटना टाळता येतील. या ठिकाणी रस्त्यावर फळ व इतर वस्तूंच्या विक्रेत्यांच्या हातगाड्या लागतात. त्या गाड्यांपुढे ग्राहक दुचाकी, चारचाकी उभ्या करतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कायमच कोंडी होते. बेशिस्तपणे वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची गरज आहे.
टवाळखोरांवर हवी कारवाई
शहरातील स्टेशन रोडवरील ग्रामीण रुग्णालय ते डॉ हेडगेवार चौक हा कायम गर्दीचा व वाहतुकीचा प्रमुख रस्ता आहे. मात्र या रस्त्यावर टवाळखोर युवकांकडून कर्कश आवाजात हॉर्न वाजवणे, सुसाट दुचाकी चालवणे, ट्रिपल सीट गाड्या चालवणे, समोरच्या दुचाकीला कट मारणे हे प्रकार नित्याचेच झाले आहेत. कर्तव्यदक्ष असलेले पोलीस अधिकारी डॉ जयस्वाल यांनी यावर लगाम लावावा बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावावी अशी अपेक्षा नागरिकांची त्यांच्याकडून आहे. तसेच याच रस्त्यावर शाळा असल्याने शाळा सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी हि मुले रस्त्यावर उभे राहतात. शाळेत येणाऱ्या मुलींची छेड काढणे, अश्लील टॉन्टिंग करणे, अश्लील हावभाव करण्याची विकृती वाढली आहे याला पायबंद घालण्याची गरज आहे.
अवैध धंदे जोमात
शहर व परिसरात चालणाऱ्या सट्टा, जुगार, विदेशी व देशी दारूची अवैध विक्री, ग्रामीण भागात सुरू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्टी बंद करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. अवैध धंद्यांवर कायद्याचा अंकुश ठेवल्यास गुन्हेगारीला आळा बसू शकतो. याकडे निरीक्षक जयस्वाल यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. शहरात बंद घरे फोडण्याच्या घटना सातत्याने घडत असतात. यासाठी रात्रीची गस्त वाढविण्याची नागरिकांची मागणी आहे.
अवैध प्रवाशी वाहतुक बेफाम
रावेर-फैजपूर, रावेर-पाल, रावेर-बऱ्हाणपूर, या प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवाशी वाहतूक सुरू आहे. या वाहन चालकांकडून समोरच्या वाहनाला कट मारणे, मध्येच अर्जंट वाहन थांबवणे व वाळवणे हे प्रकार अपघातास कारणीभूत ठरत आहेत. अवैध वाळूची वाहतुक रात्रीच्या वेळी बिनधास्त सुरु आहे. याची पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची गरज आहे. अवघ्या पाच मिनिटात दंगासदृश परिस्थिती नियंत्रणात आणणारे उपनिरीक्षक तुषार पाटील, सचिन नवले, यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी असे लढावू योद्धे डॉ जयस्वाल यांच्या तालमीत कार्यरत आहेत. गुन्ह्यांचा काही तासांत तपास करून आरोपीना गज मोजायला लावणारे विविध शाखांचे कर्मचारी पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या सोबत आहेत. याचा कुशलतेने वापर करून रावेर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारांवर वाचक निर्माण करण्यासह शांतता व कायदा सुव्यस्था टिकवून ठेवण्यात या अधिकाऱ्यांना निश्चितच यश मिळेल.शहरात विविध प्रकारचे उपक्रम राबवून शांतता व कायदा सुव्यवस्था कायम टिकवून ठेवण्यासाठी डॉ जयस्वाल यांनी प्रयत्न करावेत. शहर व परिसरातील नागरिक त्यांच्या या उपक्रमांना नक्कीच सहकार्य व साथ देतील यात कोणतीही शंका नाही. .