रावेर बाजार समितीत महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय  : नेत्यांनी पाठ फिरवल्याने भाजपच्या पॅनलचा पराभव  

रावेर बाजार समितीत महाविकास आघाडी

रावेर बाजार समितीत महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय  : नेत्यांनी पाठ फिरवल्याने भाजपच्या पॅनलचा पराभव  
रावेर बाजार समितीतील महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख आमदार शिरीष चौधरी , माजी आमदार अरुण पाटील यांच्यसह विजयी उमेदवार

कृष्णा पाटील/रावेर
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघडीने १८ पैकी १३ जागांवर मिळवलेल्या विजयातून या तिन्ही पक्षांची एकजूट दिसून आली आहे. माजी आमदार अरुण पाटील यांचा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत झालेल्या अनपेक्षित पराभवाची खदखद जनतेने महाविकास आघाडीच्या पॅनलला विजयी करत दाखवून दिली आहे. भाजपने चुकीच्या व्यक्तींना उमेदवारी देत उतरवलेले पॅनल मतदारांनी सपशेल नाकारले आहे.  या निवडणुकीवर आमदार शिरीष चौधरी व माजी आमदार अरुण पाटील यांचा प्रभाव अधिक असल्याचे दिसून येते. खासदार रक्षा खडसे यांचा तालुक्यात कोणताही प्रभाव नसल्याचे दिसून आले. 

येथील बाजार समितीच्या १८ जागांपैकी १३ जागांवर महा विकास आघाडीने, ३ जागांवर भाजप शिंदे गटाने, तर २ जागांवर अपक्षांनी बाजी मारली. गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीपासून सुरु असलेली सर्व पक्षीय पॅनलची परंपरा यावेळी मोडून काढण्यात महाविकास आघडीच्या नेत्यांना यश मिळाले आहे. माजी मंत्री एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीच्या येथील मेळाव्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या केलेल्या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद देत खरे केले आहे

सर्वपक्षीय पॅनलचा प्रयत्न फोल

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी यावेळीही सुरुवातीला सर्व पक्षीय पॅनलचा प्रयत्न झाला होता. मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील घटनांचा संदर्भ देत एका उमेदवाराला या पॅनलमध्ये संधी न देण्याचा निर्णय माजी आमदार अरुण पाटील यांनी घेतला होता. मात्र भाजपच्या नेत्यांनी या उमेदवाराचा आग्रह धरल्याने सर्वपक्षीय पॅनलला माजी आमदार पाटील यांनी नकार दिला. राष्ट्रवादीचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी माजी आमदार अरुण पाटील, आमदार शिरीष चौधरी व शिवसेनेचे (ठाकरे गट) योगीराज पाटील यांच्याशी चर्चा करून महाविकास आघाडीद्वारे निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला. व येथेच सर्वपक्षीय पॅनलचा बिमोड झाला.

प्रचारात महाविकासची आघाडी

निवडणुक जाहीर झाल्यानंतर तात्काळ महाविकास आघाडीने कार्यकर्त्यांचा व मतदारांचा मेळावा व बैठका घेऊन सर्व समावेशक पॅनल तयार करून प्रचारात आघाडी घेतली. तर भाजप शिंदे गटाकडे पॅनलसाठी अवशक असलेले उमेदवारांचे संख्याबळ नव्हते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील घटनांमुळे महाविकास आघाडीने नाकारलेल्या 'त्या' उमेदवाराला भाजपच्या नेत्यांनी पॅनलमध्ये स्थान दिले. तर काही आयात केलेल्या उमेदारांची जुळवाजुळव करत पॅनल तयार करण्यात आले. भाजप शिंदे गटाच्या पॅनलची पिछेहाट होण्यास येथेच सुरूवात झाली. प्रचार शुभारंभ करताना भाजपने गर्दी जमवली होती पण त्यात मतदार कमी व पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेच अधिक होते. प्रचार शुभारंभवेळी भाजपचे नेते गिरीश महाजन, शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील येवू शकले नव्हते. तर प्रचार शुभारंभ वेळी उपस्थित असलेल्या खासदार रक्षा खडसे, जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे यांनी त्यानंतर पॅनलच्या उमेदवारांकडे फिरकूनही पाहिले नाही. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी प्रचार काळात रावेर तालुक्याचा दौरा करत भाजप पॅनलच्या उमेदवारांना दिलासा दिला नाही. तालुक्यात पॅनलचे नेतृत्व करणारे भाजप शिंदे गटाचे पहिल्या फळीचे कुणीही नेते मैदानात उतरले नाही. यामुळे या पॅनलचे उमेदवार एकाकी पडले. तर मंत्री महाजन यांनी जबाबदारी सोपवलेली भाजपची दुसरी फळी मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्यात सपशेल अपयशी ठरली. याउलट महा विकास आघाडीचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, आमदार शिरिष चौधरी, माजी आमदार अरुण पाटील यांनी दोन वेळा मेळावे घेऊन मतदारांना विश्वासात घेतले. माजी आमदार अरुण पाटील, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील यांनी प्रचारासाठी संपुर्ण तालुका पिंजून काढला. 


माजी आमदारांचा प्रभाव कायम

बाजार समितीच्या निवडणूकीत महा विकास आघाडीला बहुमत मिळाले आहे. आघाडीला मिळालेल्या १३ जागांपैकी राष्ट्रवादीला ६ जागा, काँग्रेसला ५ जागा तर शिवसेना (ठाकरे) गटाला २ जागा मिळाल्या आहेत. असे असले तरी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी शिफारस केलेले उमेदवार कैलास सरोदे, आमदार शिरीष चौधरी यांनी शिफारस केलेले त्यांच्याच गावचे उमेदवार किशोर चौधरी व माजी आमदार अरुण पाटील यांनी शिफारस केलेले उमेदवार लक्ष्मण मोपारी यांचा झालेला पराभव या तिन्ही नेत्यांना विचार करायला लावणारा आहे. किशोर चौधरी व लक्ष्मण मोपारी यांचा निसटता पराभव झाला आहे. रावेर विधानसभा मतदार संघात रावेर व यावल तालुक्यातील गावांचा समावेश आहे. आमदार शिरीष चौधरी यांचा जसा रावेर तालुक्यात प्रभाव दिसला तसा यावल बाजार समितीच्या निवडणुकीत दिसून आला नाही हे निकालावरून दिसून आले. रावेर तालुक्यात माजी आमदार अरुण पाटील यांचा प्रभाव कायम असल्याचे या निवडणुकीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
  
यामुळे झाला भाजपचा पराभव

भाजप शिंदे गटाचे नेते पॅनलच्या उमेदवारांमध्ये विश्वास निर्माण करू शकले नाही. भाजपच्या जेष्ठ पदाधिकाऱ्याचा विरोध असतानाही नेत्यांनी महाविकास आघाडीने नाकारलेल्या "त्या "उमेदवाराला पॅनलमधून संधी दिली. प्रचारात योग्य नियोजनचा  अभाव दिसून आला. स्थानीक पातळीवरील पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवून नेते मोकळे झाले. प्रचारात सुसूत्रता दिसून आली नाही. मतदारांचे मेळावे घेवून मतदारांमध्ये विश्वास निर्माण करता आला नाही. खासदार रक्षा खडसे यांचा तालुक्यात नसल्याचे दिसून आले. 

महाविकास आघाडीचा यामुळे विजय

काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट यांचा परस्परांशी समन्वय दिसून आला. आमदार एकनाथ खडसे, आमदार शिरीष चौधरी व माजी आमदार अरुण पाटील मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्यात यशस्वी झाले. दोन वेळा मेळावे व प्रचार शुभारंभ सभेतून मतदारांशी संवाद साधला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील घटनांची पॅनल प्रमुखांनी मतदारांना वारंवार आठवण करून दिली. 

प्रहार जनशक्ती पॅनल ठरले घातक

महाविकास आघाडी व भाजप शिंदे गट पुरस्कृत पॅनलमध्ये जरी खरी लढत झाली असली तरी प्रहार जनशक्ती पक्षाचे परिवर्तन शेतकरी पॅनल भाजपसाठी डोकेदुखी ठरले. या पॅनलच्या उमेदवारांनी घेतलेली मते भाजप शिंदे गटाच्या पॅनलच्या पराभवाला कारणीभूत ठरली आहेत. तर ग्रामपंचायत मतदार संघातून अपक्ष उमेदवार गणेश महाजन व सोसायटी मतदार संघातून अपक्ष पितांबर पाटील यांचा झालेला विजय चर्चेचा विषय ठरला आहे. 

५ माजी संचालक पराभूत , ७ नवख्यांना संधी
अतिशय अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत माजी आमदार अरुण पाटील यांचे पुतणे मंदार पाटील यांची राजकारणात एंट्री झाली आहे. त्यांच्यासह मनीषा पाटील, सविता पाटील, जयेश कुयटे, सिकंदर तडवी, रोहित अग्रवाल, व विलास चौधरी या नवख्यांना मतदारांनी कौल देत संधी दिली आहे. तर माजी संचालक कैलास सरोदे, गोंडू महाजन, दिलीप पाटील, गोपाळ नेमाडे  व कल्पना पाटील यांचा प्रमुख पराभूत उमेदवारांमध्ये समावेश आहे.