वादळी पावसाने केळी बागांच्या ७५ कोटींच्या नुकसानीचा अंदाज
वादळात उडाल्याने बालिकेचा मृत्यू : रावेरातील घटना
प्रतिनिधी / रावेर
गुरुवारी तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने २७ गावांच्या शेती शिवारातील कापणीला असलेल्या केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या वादळामुळे सुमारे ७५ कोटींचे केळी बागांचे नुकसान झाल्याचा अंदाज जेष्ठ शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. तर वीज मंडळाचे ४० लाखांचे तर घरांची पडझड झाल्याने उमरे १५ लाखांचे असे एकूण सडे पंच्याहत्तर कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान गुरुवारी वादळात उडालेल्या बालिकेचा उपचार सुरु असताना शुक्रवारी मृत्यू झाला आहे.
गुरुवारी तालुक्याला वादळी पावसाने चांगलेच झोडपले. यात अनेक घरांवरील पत्रे उडाले असून २२७ घरांची पडझड झाली आहे. घरांच्या नुकसानीचा आकडा सुमारे १५ लाख रुपयांपर्यंत आहे. तर तालुक्यातील २७ गावांच्या शेती शिवारातील कापणीला असलेल्या केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या वादळामुळे सुमारे ७५ कोटींचे केळी बागांचे नुकसान झाल्याचा अंदाज जेष्ठ शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. वादळामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. ग्रामीण पाणी पुरवठा योजनेवरून होणार पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. शहरातील वीज पुरवठा सुरळीत सुरु करण्यासाठी युद्ध पातळीवर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे, उप विभागीय अभियंता अनिल पाटील यांनी शहरातील नुकसानग्रस्त खांब व तुटलेल्या वीज वाहिन्यांची पाहणी केली
वादळात उडालेली बालिका दगावली
वादळामुळे शहरातील मदिना कॉलनीतील एका घरावरील पत्रे उडाली होती. या घराच्या छताला लावलेल्या पाळण्यातील तीन महिन्याची बालिका वादळामुळे उडून बाजूला फेकली गेली होती. दोन दिवसापासून या गंभीर अवस्थेतीतील बालिकेवर बऱ्हाणपूर येथील एका रुग्णालयात उपचार सुरु असताना शुक्रवारी तिचा मृत्यू झाला.
वीज मंडळाचे सुमारे ४० लाखांचे नुकसान
गुरुवारी तालुक्यात जोरदार झालेल्या वादळाने शहरासह ग्रामीण भागात व शेती शिवारात मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब मोडून पडले आहेत. तीन ते चार ठिकाणी ट्रान्स्फार्मर पडलेले आहेत. तर बहुतांशी भागात वीज वाहिन्या तुटल्याने गुरुवारपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे. ४० तास उलटूनही काही भागात वीज पुरवठा सुरळीत सुरु झाला नव्हता. शनिवारी रात्री उशिरापर्यंत शहरातील सर्व भागातील वीज पुरवठा सुरळीत सुरु करण्यात येईल अशी माहिती उप विभागीय अभियंता अनिल पाटील यांनी दिली. दरम्यान या वादळामुळे वीज मंडळाचे सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली.
पिकांच्या नुकसानीचे क्षेत्र (कंसात शेतकरी संख्या)
उटखेडा-३२(६५), भाटखेडा-२८(६०), पिंप्री-७२(८८) , मंगरूळ-१४०(१७२), मोहगन-५५(८२), अहिरवाडी-९८(१८५) निरुळ-६५(८५), केऱ्हाळा बुद्रुक-१०४ (१३०), केऱ्हाळा खुर्द-६७(८४), भोकरी-९(७), जुनोना-२२(२८), पाडले खुर्द-५२(६८) पाडले बुद्रुक-५८(६७), खानापूर-१५(२०), अभोडा बुद्रुक-५०(४०), अभोडा खुर्द-१२(१५), जिन्सी-२५(३५), विवरे बुद्रुक-४(१०), अजनाड-१८(१५), कुसूंबा बुद्रुक-७२९७०) कुसूंबा खुर्द-१००(१२०), मुंजलवाडी-९०(८०), करजोद-७(७), रावेर-५०(११०), पातोंडी-२(२), पुनखेडे-२(२), लालमाती ३(५) .