दीड लाखाचा मुद्देमाल जप्त : आरोपी पळून जाण्यात यशस्वी
वनविभागाची कारवाई
प्रतिनिधी / रावेर
सातपुड्यातील पाल परिमंडळात मांजल रस्त्याने अवैध डिंक वाहतूक प्रकरणी तीन मोटारसायकल व १२८ किलो डिंक असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तीन अज्ञात आरोपींविरुद्ध वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन कर्मचाऱ्यांना रावेर वनक्षेत्रातील क.नं ५६ मधून मांजल रस्त्याने गस्त करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी मोटार सायकल क्रमांक एमपी १० एमइ ९५१६ एचएफ डिलक्स, एमपी १० एमक्यू ४४९२ स्मार्ट हिरो व एमइ १० एमजी ३४९४ या तीन मोटरसायकलीवरून अवैध डिकांची वाहतूक होत असल्याचे लक्षात आले. दुचाकीस्वारांना थांबण्याचा इशारा केला असता ते दुचाकी तेथेच सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. यावेळी साधारण ११८ किलो सलाई व २० किलो धावडा डिंक जप्त केला. १२९८० रुपयाचा ११८ किलो सलई डिंक व ४००० रुपये किमतीचा २० किलो धावडा डिंक तसेच तीन मोटारसायकल किंमत १ लाख ३३ हजार असा एकूण १ लाख ४९ हजार ९८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.हि कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांच्या मार्गदशनाखाली वनपाल डी.जी. रायसिंग, वनरक्षक एम.एम तडवी व कायम वनमजूर यांनी केली आहे.