निंभोरा ग्रामपंचायतीची लवकरच चौकशी बिडीओ मेढे : कामे सुरु ठेवा सरपंचांसह 13 सदस्यांची मागणी

15 व्या वित्त आयोगातील निकृष्ट कामाबाबत तक्रार

निंभोरा ग्रामपंचायतीची लवकरच चौकशी बिडीओ मेढे : कामे सुरु ठेवा सरपंचांसह 13 सदस्यांची मागणी

प्रतिनिधी/रावेर

रावेर तालुक्यातील निंभोरा येथील 15 व्या वित्त आयोगातून निकृष्ट दर्जाची कामे झाल्याची तक्रार तीन ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी( ग्रामपंचायत )यांच्याकडे केली आहे. त्याची दखल घेवून उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी एस अकलाडे यांनी बिडीओ विनोद मेढे यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लवकरच या ग्रामपंचायतीची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती बिडीओ विनोद मेढे यांनी दिली आहे.

निंभोरा येथील ग्रामपंचायतीने केलेल्या 15 वा वित्त आयोगाच्या कामात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय सदस्य मनोहर तायडे रेखा कोळंबे व मंदाकिनी बऱ्हाटे यांनी दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. या कामांची बिले अदा करण्यात येऊ नये अशी मागणी या सदस्यांनी तक्रारीत केलेली आहे. दरम्यान ग्रामपंचायत सदस्य मनोहर तायडे यांनी जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी बी एस आकलाडे यांची प्रत्यक्ष भेट घेवून तक्रार केल्याने अकलाडे यांनी बिडीओ विनोद मेढे यांना चौकशी करून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात चौकशीला सुरुवात होणार असल्याची माहिती बिडीओ श्री मेढे यांनी दिली आहे. 

सरपंचांसह 13 सदस्य पंचायत समितीत

15 वा वित्त आयोगातील कामांची तक्रार करीत याची चौकशी करण्याची मागणी तीन सदस्यांनी केल्यानंतर सरपंच, उप सरपंचांसह 13 सदस्यांनी सोमवारी पंचायत समिती गाठली. व ग्रामविस्तार अधिकारी प्रवीण शिंदे यांना निवेदन देत ही कामे सुरु ठेवण्याची मागणी केली आहे. कामे बंद केल्यास गावाचा विकास पूर्णपणे थांबेल असे निवेदनात म्हटले आहे. ही कामे उत्कृष्ट दर्जाची असल्याचा थेट दाखला या 13 सदस्यांनी निवेदनात देत कामांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.