अमेरिकेत आषाढी एकादशीला घुमला विठ्ठल नामाचा गजर
४०० भाविकांची दररोज १ हजार मैलांची पायी वारी
कृषीसेवकसाठी थेट अमेरिकेतून प्रवीण पाटील
न्यू जर्सी (अमेरिका ): महाराष्ट्रातील मूळ रहिवासी व सध्या न्यू जर्सीस्थित तीन मराठी उद्योजकांनी तेथे गेल्या महिन्यात मराठी माणसाचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रखुमाईचे मंदिर उभारले आहे. २९ जूनला झालेली आषाढी एकादशी तेथे मराठी माणसांनी रिंगण व दिंडी सोहळ्याद्वारे साजरी केली. ढोल, ताशा व टाळ, चिपळ्यांच्या गजरात विठ्ठल नामाचा परदेशात मराठी भाविकांनी केलेला जयघोष अमेरिकेत भारतीय संस्कृती व वारकरी संप्रदायाचे वैशिट्य ठरवणारे ठरले.
महाराष्ट्रातील आनंद चौथाई व त्यांची पत्नी अश्विनी, प्रवीण पाटील व त्यांची पत्नी वैशाली (सोनाळे ता जामनेर जि. जळगाव) आणि भालचंद्र कुलकर्णी व पत्नी वृंदा यांनी न्यू जर्सीत विठ्ठल रखुमाईच्या मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला. याची माहिती अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या मराठी माणसांना जशी समजत गेली तसे असंख्य मदतीचे हात पुढे आले. गेल्या महिन्यात हे मंदिर पूर्णत्वास आले. पंढरपूरातून आणलेल्या मूर्ती, ठाण्याहून डॉ रविराज अहिरराव यांनी अभिमंत्रित केलेले श्रीयंत्र व सुलभा खरे ह्यांनी पौरोहित्य करून २१ मे २०२३ रोजी प्राणप्रतिष्ठा केली. पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागलेल्या न्यूजर्सीतील मराठी माणसानी एकत्र येत आषाढी एकादशीला पांडुरंगाचा महिमा परदेशात यानिमित्ताने मराठी भाविकांनी जोपासला आहे. विशेष म्हणजे या सोहळ्यात तिन्ही कुटुंबातील अमेरिकेत जन्मलेली मुले सुद्धा सहभागी झाली होती.
आळंदी ते पंढरपूर २६० किलोमीटर पायी वारीचा अनुभव असलेल्या न्यू जर्सीच्या दोन वारकरी चित्रा भावे आणि राजश्री कुलकर्णी यांनी अमेरिकेत वारीची संकल्पना राबविली. त्याचे पूर्ण नियोजन आणि व्यवस्थेची जबाबदारी दोघीनी उचलली. पाहता पाहता ४०० मराठी माणसे रोज एक हजाराहून जास्त मैल चालू लागली. अमेरिकेतील मैदानामध्ये व उद्यानांमध्ये हरिपाठाचा आवाज घुमू लागला. गोल रिंगण सोहळा सहाशेहुन निरंजन देवच्या नेतृत्वाखाली २५ स्वयंसेवक, राजश्री कुलकर्णी व त्यांच्या मैत्रिणींचे लेझीम पथक, सारिका कदम व तिच्या साथीदारांची जल्लोष ढोल ताशा पथक व रिंगणात चालणारे ६०० भाविक असा नयनरम्य सोहळा न्यू जर्सीत संपन्न झाला. अमेरिकेतील मराठी माणूस स्वतःचा मोठा ठसा उमटवीत आहे. मराठी माणसाचा केंद्र बिंदू बनेल व सतत प्रेरणा मिळावी यासाठी मध्य व दक्षिण न्यू जर्सीत मोठे मंदिर उभारण्यात येणार आहे.