BREKING : लिंकिंगबाबत कंपन्यांची मुजोरी : माफदा संघटना आक्रमक : उद्यापासून रासायनिक खतांची खरेदी बंदचा कृषी विक्रेत्यांचा निर्णय

कृषीमंत्र्यांच्या आदेशाला कंपन्यांकडून केराची टोपली

BREKING : लिंकिंगबाबत कंपन्यांची मुजोरी : माफदा संघटना आक्रमक : उद्यापासून रासायनिक खतांची खरेदी बंदचा कृषी विक्रेत्यांचा निर्णय

कृष्णा पाटील / रावेर

रासायनिक खत उत्पादक कंपन्या व पुरवठादारांकडून कृषी निविष्ठा विक्रेत्यांना रासायनिक खतांचा पुरवठा करतांना अनावश्यक खते बळजबरीने दिली जातात. ही अनावश्यक खते शेतकरी घेत नसल्याने विक्रेत्यांकडे याचा मोठ्या प्रमाणावर साठा शिल्लक आहे. यामुळे विक्रेत्यांवर आर्थिक बोजा वाढला आहे. कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेवून लिंकिंग करणाऱ्या कंपन्या व पुरवठादारांवर कारवाई करावी अशी मागणी माफदा संघटनेतर्फे अध्यक्ष विनोद तराळ-पाटील व महासचिव विपिन कासलीवाल यांनी निविष्ठा व गुण नियंत्रक संचालक सुनील बोरकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान १ मे (उद्यापासून) लिंकिंगला विरोध म्हणून कंपन्या व पुरवठादारांकडून होणारी रासायनिक खतांची खरेदी व उचल थांबविण्याचा निर्णय माफदा संघटनेने घेतला आहे.

रासायनिक खत उत्पादक कंपन्या अधिक नफा मिळविण्यासाठी विक्रेत्यांकडून मागणी असलेल्या खतांचा पुरवठा करतांना मागणी नसलेल्या अनावश्यक खतांचाही लिंकिंगद्वारे पुरवठा करतात. मात्र शेतकरी खते विकत घेताना अनावश्यक खते घेत नाही. त्याचा परिणाम विक्रेत्यांकडे या खतांचा साठा पडून असून विक्रेत्यांच्या रक्कमा अडकल्या आहे. लिंकिंग बंद करण्याबाबत माफदा संघटनेकडून गेल्या चार पाच वर्षापासून सातत्याने शासन दरबारी पाठपुरवा सुरु आहे. मात्र अद्यापही लिंकिंग बंद होऊ शकलेली नाही.

कृषिमंत्र्यांचा आदेश धुडकावला

राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर कृषी विभागाचे प्रधान सचिव, कृषी आयुक्त, रासायनिक खत कंपन्याचे प्रतिनिधी व माफदा संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत २९ जानेवारी २०२५ रोजी बैठक झाली होती. त्यावेळी कृषिमंत्री कोकाटे यांनी लिंकिंग बंद करण्याचे सर्व कंपन्यांना आदेश दिले होते. मात्र कृषी मंत्र्यांचा आदेश धुडकावून लावत कंपन्यांनी मनमानी पद्धतीने लिंकिंग सुरूच ठेवली आहे.

रासायनिक खतांची उद्यापासून उचल बंद

लिंकिंगबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रार करूनही यावर कोणतीही कारवाई या विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेली नाही. खत निर्मिती कंपन्यांकडून लिंकिंगच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर माफदा संघटनेने उद्यापासून(१ मे) रासायनिक खतांची खरेदी व उचल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील लिंकिंग पूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत एकही कृषी विक्रेता रासायनिक खतांची खरेदी करणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

“खत निर्मिती कंपन्यांच्या लिंकिंग धोरणाला राज्यातील कृषी विक्रेता कंटाळले आहेत. कंपन्यांचा “तोंड दाबून बुक्क्यांचा मार” असा प्रकार विक्रेत्यांबाबत सुरु आहे. याबाबत राज्यभरातील विक्रेत्यांकडून तक्रारी आल्यावर कृषी विभागाकडे कारवाईची मागणी केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने २४ एप्रिलला झालेल्या माफदा संघटनेच्या बैठकीत १ मे पासून रासायनिक खतांची खरेदी व उचल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व रासायनिक खत विक्रेते यात सहभागी होणार आहेत."

 ----- विनोद तराळ पाटील, अध्यक्ष, माफदा संघटना, पुणे