आरटीओ अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण सहकार्य तर पोलिसांकडून एंट्रीच्या नावाखाली वसुली
रावेर-पाल रस्त्याचा ओव्हरलोड वाहतुकीसाठी वापर
प्रतिनिधी / रावेर
आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील खानापूरजवळ असलेला सीमा तपासणी नाका चुकवून मध्यप्रदेशात अवैध व ओव्हरलोड वाहतूक पाल मार्गे रात्रंदिवस सुरु आहे. त्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडत आहे.
रावेर हा महाराष्ट्राच्या सीमेवरील तालुका असून तालुक्यातून मध्यप्रदेशात जाण्यासाठी अंकलेश्वर बऱ्हाणपूर हा महामार्ग आहे. या मार्गावर पूर्वी चोरवडजवळ आरटीओ विभागाचा सीमा तपासणी नाका होता. मात्र काही महिन्यापूर्वी हा नाका खानापूरजवळ कार्यान्वित करण्यात आला आहे. मात्र हा नाका आता केवळ नावापुरताच उरला आहे. या मार्गावरील वाहनांची संख्या लक्षात घेऊन राज्यमार्गातून राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्यात आले आहे. असे असताना एकेकाळी चोरवड नाक्यावरून मालवाहू वाहनांची होणाऱ्या वाहतुकीत मात्र कमालीची घट झाली आहे. वाहनांची संख्या का घटली याची सर्व माहिती आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती नसावी ही सर्व सामान्यांना न पटणारी बाब आहे.
पालमार्गे वाहतूक मध्यप्रदेशात
खानापूर येथील सीमा तपासणी नाका संगणकीकृत करण्यात आल्याने अवैध व ओव्हर लोडमालाची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी पालमार्गाची मध्यप्रदेशात जाण्या-येण्यासाठी निवड केली आहे. या मार्गावरून रात्रंदिवस बिनबोभाटपणे अवैध वाहतूक सुरु आहे. या मार्गावरून मध्यप्रदेश व पुढील उत्तरेकडील राज्यात विना अडचण जाता येते. रात्रीच्या वेळी या वाहनांची रावेर-पाल-भिकनगाव मार्गे मध्यप्रदेशात मोठी वाहतूक सुरु आहे. या वाहतुकीला आरटीओ विभागाने आळा बसवावा अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
पाल जवळील शेरी नाका येथे रात्रीच्या वेळी पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जाते. मात्र ओव्हरलोड वाहनांकडून तपासणीच्या नावाखाली नाक्यावरील पोलीस "एंट्री"च्या नावाखाली येथून प्रत्येक वाहन चालकांकडून रक्कम वसूल करत असल्याचे चालकांनी सांगितले. हा तपासणी नाका रावेर पोलीस ठाण्यांतर्गत असून पाल येथील औट पोस्टचे कर्मचारी येथे कार्यरत आहेत.