BREAKING : रावेरमध्ये नगरसेवकाच्या घरात जबरी चोरी : लाखोंचा ऐवज लंपास : पोलीस घटनास्थळी
पोलिसांपुढे तपासाचे आव्हान
प्रतिनिधी /रावेर
रावेर शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या रामबाग परिसरात राहणारे नगरसेवक दिलीप हिरामण पाटील यांच्या राहत्या घरात चोरट्यांनी रात्री खिडकीचे लोखंडी गज कापून रोख रक्कमसह सोन्याचंदीचे दागिने चोरून नेले आहेत. लाखो रुपयांचा ऐवज या घटनेत चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी सुरु केली आहे.
रावेर शहराचा मुख्य भाग असलेला रामबाग परिसर पोलीस ठाण्यापासून अवघ्या 300 मिटर अंतरावर आहे. या परिसरात स्टेट बँक, आयडीबीआय बँक, जळगाव जनता बँक, जळगाव पीपल्स बँक, एच डी एफ सी बँक, ऍक्सिस बँक, महाराष्ट्र बँक, येस बँक, सेंट्रल बँक अशा एकूण 9 बँका आहेत. तसेच किराणा व कापड व्यवसायिकांचे मोठे मॉल व काही हॉस्पिटल आहेत. याच भागात नगरसेवक दिलीप पाटील व त्यांच्या वाहिनी नगरसेविका प्रमिला चुडामण पाटील यांचा रहिवास आहे. गुढीपाडव्याच्या मध्यरात्री दिलीप पाटील यांच्या घराच्या मागील बाजूने अज्ञात चोरट्यांनी खिडकीचे लोखंडी गज कापून घरात अनधिकृतपणे प्रवेश करीत चोरी केली आहे. कपाटातील रोख रक्कम व सोन्याचंदीचे दागिने असा मिळून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. चोरी झाली तेव्हा दिलीप पाटील कुटुंबियांसह घरात झोपलेले होते. मात्र याचा त्यांना चोरट्यांनी थांगपत्ता लागू दिला नाही. आज सकाळी उठल्यावर घरात चोरी झाल्याची घटना त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिल्यावर पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी ठसे तज्ञ व श्वानपथक दाखल झाले असून तपासाच्या दृष्टीने पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात झालेल्या या जबरी चोरीच्या घटनेने शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिसांपुढे तपासाचे आव्हान
पोलीस ठाण्यापासून अवघ्या 300 मीटर अंतरावर झालेल्या धाडसी चोरीच्या घटनेने पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

krushisewak 
