रावेर तालुक्यात अवकाळीने 22 कोटींचे नुकसान : आमदार अमोल जावळे यांच्या तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या प्रशासनाला सूचना
उद्यापासून नुकसानीचे पंचनामे : तहसीलदार कापसे

प्रतिनिधी / रावेर
रावेर तालुक्यात आज दुपारी चार वाजता वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यावेळी गारपीट झाल्याने 19 गावांच्या शेतीशिवारातील केळी बागांचे नुकसान झाले आहे. या वादळी पावसाने 510 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून 732 शेतकऱ्यांचे 22 कोटी 66 लाख 44 हजार रुपयांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. नुकसानीची दखल आमदार अमोल जावळे यांनी घेतली असून नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. दरम्यान उद्यापासून नुकसानीचे कृषी व महसूल विभागातर्फे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती तहसीलदार बी ए कापसे यांनी दिली.
गेल्या तीनचार दिवसापासून तापमानाचा पारा 45 अंशापर्यंत पोहचला होता. आज सकाळपासून उन्हाची तीव्रता कमी असल्याने वातावरणात काहीसा बदल झाला होता. दुपारी चार वाजता अचानक वादळी वाऱ्यासह शहर व परिसरात पावसाला सुरुवात झाली. पहिले तीनचार मिनिटे शहरात गारांचा तुफान वर्षाव झाला. चार वाजेपासून सुरु झालेला पाऊस साडेपाच वाजेपर्यंत सुरूच होता.
22 कोटींच्या नुकसानीचा अंदाज
आज झालेल्या अवकाळी पावसाचा रावेर तालुक्यातील 19 गावांना तडाखा बसला आहे. यात 510 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी व महसूल विभागाने वर्तवला आहे. यात 22 कोटी 66 लाख 44 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नुकसानग्रस्त गावे बाधित क्षेत्र व कंसात शेतकरी संख्या पुढीलप्रमाणे : उटखेडा-18(25), भाटखेडा-18(25), खीरवड-12(20), नेहेते-12(20), दोधे-10(15), रावेर-280(395), निंबोल-13(17), अजंदे-7(15), गौरखेडा-5(13), पातोंडी-10(15), विटवे-12(16), पुनखेडा-14(18), विवरे खुर्द-14(20), विवरे बुद्रुक-18(24), वडगाव-8(11), कुसुम्बा खुर्द-22(35), कुसुम्बा बुद्रुक-18(26), लालमाती-2(2), लोहारा -7(20)
"अवकाळी पावसाने रावेर तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी व पंचनामे कृषी व महसूल विभागातर्फे उद्यापासून करण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत."
---- बी ए कापसे, तहसीलदार, रावेर
"अवकाळी पावसाने रावेर तालुक्यातील केळी बागांचे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे तातडीने करून नुकसानीचा अहवाल शासनाकडे आर्थिक मदतीसाठी पाठविण्यात येईल. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल."
---अमोल जावळे, आमदार- रावेर