गोमांस विक्री प्रकरणी पोलिसांची पाच दिवसात दुसरी कारवाई : रावेर तालुक्यात गोवंश वाहतूक, तस्करी सुरूच
पतिपत्नी विरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी / रावेर
रावेर तालुक्यात गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक, तस्करी व कत्तल करण्याचे प्रकार सर्रास सुरु आहे. रसलपूर येथील कत्तल खान्यावर पोलिसांनी धाड टाकल्यानंतर पाचव्याच दिवशी रावेर शहरातील कुरेशी मोहल्ला भागात गोमांस विक्री प्रकरणी पतिपत्नी विरुद्ध पोलिसांनी कारवाई केली असून या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवारी पहाटे रसलपूर येथील कत्तलखान्यावर पोलिसांनी धाड टाकून दीड लाख रुपये किमतीचे गोमांस, कुऱ्हाड व सुरे जप्त केले होते. याप्रकारणी सादिक शेख नुरा, वसीम कय्युम कुरेशी, शेख शकील शेख कलीम व सलीम उस्मान कुरेशी हे चौघे गोमांस विक्री करताना आढळून आले होते. त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या कारवाईला पाच दिवस उलटत नाही तोच गोवंश तस्करांनी पुन्हा डोके वर काढले आहे. शहरातील कुरेशी मोहल्ला येथे आज अवैधरीत्या गोमांस विक्री सुरु असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख यांच्यासह कल्पेश आमोदकर, प्रमोद पाटील, महेश मोगरे,विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, सुकेश तडवी, सचिन घुगे यांच्या गुन्हे शोध पथकाने धाड टाकली असता नजमाबी मोहमद हुसेन भतीयारा(वय 37) व तीचा पती मोहम्मद हुसेन अहमद हुसेन भतीयारा (वय 55) हे पतिपत्नी जनावरांची कत्तल करून विक्री करण्याच्या उद्देशाने मास कापताना दिसून आले. तर त्यांना मदत करणारा एक जण पळून गेला. या दोघांवर पोलीस कर्मचारी सचिन घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 40 हजार रुपये किमतीचे गोमांस, कुऱ्हाड व सुरे पोलिसांनी जप्त केले आहे. जप्त केलेल्या गोमांसची योग्यरित्या विल्हेवाट लावली आहे.