लोकप्रतिनिधींचा पुढाकार : वर्षानुवर्षापासून बंद असलेले वनोली शिवारातील शिव रस्ते झाले मोकळे : शेतकरी भूपेंद्र सरोदे व किसन महाजन यांच्या प्रयत्नाला यश

शेतमाल वाहतूक होणार सुलभ

लोकप्रतिनिधींचा पुढाकार : वर्षानुवर्षापासून बंद असलेले वनोली शिवारातील शिव रस्ते झाले मोकळे : शेतकरी भूपेंद्र सरोदे व किसन महाजन यांच्या प्रयत्नाला यश
शिवरस्ते मोकळे झाल्यावर प्रांतधिकारी बबनराव काकडे यांचा सत्कार करताना शेतकरी

प्रतिनिधी/ यावल

यावल तालुक्यातील वनोली, रिधोरी, कोसगाव परिसरातील शिवरस्ते वर्षानुवर्षापासून बंद होते. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आमदार अमोल जावळे यांच्या दूरदृष्टीतून या प्रश्नाला प्राधान्य देण्यात आले. यासाठी शेतकरी भूपेंद्र सरोदे (चिनावल) व किसन महाजन (खिर्डी) यांनी प्रयत्न व पाठपुरावा केला. हे शिव रस्ते मोकळे करण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची भूमिका महत्वाची ठरली.  

यावल तालुक्यातील वनोली, कोसगाव, रीधोरी या भागातील शिव रस्ते अनेक वर्षापासून बंद असल्याने शेतकऱ्यांना शेतमाल वाहतूक करतांना अनेक समस्या निर्माण होत होत्या. त्यामुळे शेतकरी भूपेंद्र सरोदे व किसन महाजन यांनी यावल तहसीलदार तसेच फैजपुरचे प्रांताधिकारी यांच्याकडे अर्ज केले होते. तसेच आमदार अमोल जावळे यांच्याकडे या शेतकऱ्यांनी समस्या मांडली होती. आमदार श्री जावळे यांनी याची दखल घेवून दूरदृष्टीतून बंद असलेले शिवरस्ते मोकळे करण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या शिवरस्ते मोकळे करण्याच्या उपक्रमाला फैजपुरचे प्रांताधिकारी बबनराव काकडे, यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी तत्काळ प्रतिसाद देत बंद असलेले शिव रस्ते मोकळे करण्याची कार्यवाही केली. श्री काकडे व श्रीमती नाझीरकर यांनी स्वत: या ठिकाणी दोन दिवस थांबून हे रस्ते मोकळे केले आहेत. यावेळी नायब तहसीलदार श्री गुरव, बामणोदच्या मंडळ अधिकारी बबिता चौधरी, तलाठी व कोतवाल यांनी याकामी सहकार्य केले. शिव रस्ते मोकळे झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करीत आमदार अमोल जावळे व महसूल विभागाचे आभार मानले. प्रांताधिकारी श्री काकडे यांचा यावेळी विजय मधुकर महाजन यांनी सत्कार केला. याप्रसंगी संजय सोनवणे, निलेश वाघुळदे, प्रकाश बखाल, जीवन चौधरी, वासुदेव कोळी, प्रभाकर खाचणे, आत्माराम सोनवणे, अर्जुन सोनवणे, प्रकाश भंगाळे, अजय इंगळे यांच्यासह मोठ्या संखेने शेतकरी उपस्थित होते.