रावेर तालुक्यात अवैध वृक्षतोडीला कुणाचा वरदहस्त : भरदिवसा सावदा परिसरात हिरव्या डेरेदार वृक्षांची कत्तल
वनविभागातर्फे कारवाईची नागरिकांची मागणी

प्रतिनिधी/ रावेर
रावेर तालुक्यात रस्त्यांच्या कडेला असलेल्या हिरव्या डेरेदार वृक्षांची राजरोसपणे अवैधरीत्या कत्तल सुरु आहे. मात्र याकडे वनविभागाचे दुर्लक्ष झाले असून ही संधी साधून अवैध वृक्षतोड करणाऱ्यांकडून मोठ्या झाडांची कत्तल करण्यात येत आहे. सावदा परिसरात अवैधरीत्या वृक्षांची तोड करणारी मोठी टोळी सक्रिय असल्याची विश्वासनीय माहिती आहे. या अवैध वृक्षतोडीला नेमका वरदहस्त कुणाचा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
रावेर तालुक्यात उन्हाचा चटका गेल्या पंधरा दिवसापासून वाढला आहे. त्यामुळे दुपारी बारा एक वाजेनंतर नागरीक सहसा बाहेर पडत नाहीत. वेळेची ही संधी साधून वृक्षतोड करणाऱ्यांनी त्यांचा मोर्चा तालुक्यातील रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांकडे वळवला आहे.
भरदिवसा वृक्षतोड आणि वाहतूक
एकेकाळी वृक्षसंपदेने हिरवगारअसलेला सातपुडा गेल्या दहा वर्षात बेसुमार झालेल्या अवैध वृक्षतोडीमुळे भकास झाला आहे. जंगलतोड झाल्याने हिंस्त्र प्राणी आता थेट रहिवासी वस्त्यांपर्यंत पोहचले आहे. याच वृक्षतोड करणाऱ्यांनी आता तालुक्यातील रस्त्यांच्या कडेला असलेल्या वृक्षांना लक्ष्य केले आहे. सावदा परिसरसतील अनेक रस्त्यांच्या कडेला असलेल्या हिरव्या डेरेदार मोठ्या वृक्षांची या परिसरात कार्यरत असलेल्या टोळीकडून भरदिवसा अवैध वृक्षतोड करण्यात येत आहे. तसेच तोडलेल्या वृक्षांच्या फ़ांद्या व लाकूड ट्रॅक्टरद्वारे तात्काळ ताडपत्रीने झाकून वाहतूक करण्यात येत आहे. या पद्धतीने अशीच बेसुमार वृक्षतोड सुरूच राहिल्यास येत्या काही दिवसात तालुक्यातील रस्ते वृक्षाअभावी ओस पडण्याची अधिक शक्यता आहे.
निसर्गप्रेमींकडून नाराजी व्यक्त
सावदा परिसरातील कोचुर, रोझोदा, खिरोदा, सावखेडा, चिनावल, कुंभारखेडा, मोठे वाघोदा, रणगाव, रायपूर, तासखेडा, गहूखेडा, उदळी, थोरगव्हण, सुदगांव, लुमखेडा या गावांच्या रस्त्यांवर व परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड सुरु आहे. मात्र याकडे वनविभागाचे दुर्लक्ष झालेले आहे. मात्र या प्रकारामुळे निसर्गप्रेमिंनी नाराजी व्यक्त केली आहे.
वृक्षतोड करणारी टोळी कार्यरत
रावेर तालुक्यात रस्त्यांच्या कडेची व परिसरातील वृक्षांची कत्तल करणारी साळी, भोगी, पठाण, काळे, इरफान नामक मोठी टोळी कार्यरत आहे. या टोळीकडून दररोज वृक्षांची कत्तल केली जात असून याचा कुणाला थांगपत्ता लागू नये म्हणून तात्काळ ट्रॅक्टरद्वारे लाकडांची वाहतूक केली जाते. यात रावेर तालुक्यातील काही सॉमिल चालकांचाही सहभाग असल्याचे समजते. अवैध वृक्षतोडीला सॉमिल चालकांचा छुपा पाठिंबा असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.