रावेर तालुक्यात गुटक्याची सर्रास अवैध वाहतूक व विक्री : पोलिसांचे छुपे सहकार्य
रॅकेट सक्रीय : बऱ्हाणपूर व गुजरातमधून बिनबोभाट वाहतूक
प्रतिनिधी/रावेर
महाराष्ट्रात गुटका विक्री, वाहतुक व साठ्वानुकीवर बंदी असताना मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर व गुजरातमधील वलसाड येथून दररोज मोठ्या प्रमाणावर रावेर तालुक्यात गुटका विक्रीसाठी आणला जात आहे. या गुटक्याची रावेरमार्गे जळगाव जिल्ह्यासह शेजारील बुलडाणा व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्रास बिनबोभाट अवैध वाहतूक केली जात आहे. गुटक्याच्या वाहतूक व विक्रीला पोलिसांचे छुपे सहकार्य असल्याची चर्चा आहे. ही वाहतूक व विक्री “मनीष” नामक एजंटच्या माध्यमातून सुरु असून याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. परराज्यातून होणारी गुटक्याची वाहतूक व विक्री करणारे रॅकेट तालुक्यात कार्यरत असल्याचे आहे. याची वरिष्ठांनी दखल घेवून बिनबोभाटपणे चालणारे गुटक्याचे रॅकेट मोडून काढावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गुटक्याची वाहतूक रोखण्यात पोलिसांना अपयश
गुटका विक्री, वाहतूक व साठवणुकीवर महाराष्ट्रात बंदी असताना बऱ्हाणपूर मध्यप्रदेश येथून रावेर तालुक्यात दररोज सर्रासपणे गुटख्याची अवैध वाहतूक सुरु आहे. दररोज लाखो रुपयांचा गुटका चोरट्या मार्गाने रावेर तालुक्यात आणला जात आहे. तालुक्यात आणलेला गुटका तालुक्याच्या ग्रामीण भागात तसेच शेजारील भुसावळ, यावल, मुक्ताईनगर व जिल्ह्यात पाठवला जात आहे. खुलेआम पणे बऱ्हाणपूर येथून गुटक्याची वाहतूक होत असतांना कर्तव्यदक्ष असलेल्या स्थानिक पोलिसांना मात्र ही वाहतूक रोखण्यात अद्याप तरी यश आलेले नाही.
मनीषचे पोलिसांशी अर्थपूर्ण संबध
बऱ्हाणपूर(मध्यप्रदेश) व वलसाड(गुजरात) येथून रावेर तालुक्यात मनीष नामक गुटका माफिया कार्यरत असून तालुक्याच्या ग्रामीण भागात व इतर ठिकाणी गुटक्याची अवैध वाहतूक करण्यासाठी याच्या माध्यमातून मोठी टोळी सक्रीय आहे. दररोज अवैध वाहतुकीद्वारे मोठ्या प्रमाणावर गुटका तालुक्यात आणला जात आहे. ग्रामीण भागात गुटका विक्री व वाहतुकीत कार्यरत असलेल्यावर कारवाई टाळण्यासाठी मनीष दरमहा विशिष्ट रक्कम जमा करतो. मनीष नामक एजंट असलेल्या व्यक्तीचे स्थानिक पोलिसांशी अर्थपूर्ण संबध असल्याने गुटका तस्करीवर कारवाई होतांना दिसत नाही.
पानटपरीवर खुलेआम गुटका विक्री
रावेर शहरात व तालुक्यात असलेल्या पान टपरीवर खुलेआमपणे गुटका विक्री केली जात आहे. अन्न भेसळ प्रतिबंधक विभाग व पोलिसांनी यावर संयुक्त कारवाई केल्यास या व्यवसायात असलेले रावेर तालुक्यातील खरे चेहरे समोर येतील. गुटका विक्री वाहतूक व साठवणुकीवर निर्बंध आणण्याची मागणी रावेर तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.

krushisewak 
