निंभोरा ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत 15 व्या वित्त आयोगाच्या कामावरून खडाजंगी : कोणती कामे झाली मला माहित नाही : ग्राम अधिकाऱ्यांचे बेजबाबदार उत्तर

घाईघाईत रक्कमा खर्च करण्यासाठी ग्रामपंचायतीचा प्रयत्न

प्रतिनिधी/ रावेर

तालुक्यातील निंभोरा येथील ग्रामपंचायतीची मासिक सभा चांगलीच गाजली. 15 वा वित्त आयोगाच्या कामांबाबत सदस्यांनी आक्षेप घेत ही कामे त्वरित बंद करावीत व या कामांची चौकशी झाल्याशिवाय संबंधित ठेकेदाराला बिल अदा करण्यात येऊ नये अशी मागणी सदस्य मनोहर तायडे, रेखा कोळंबे व मंदाकिनी बऱ्हाटे यांनी केली होती. मात्र सरपंच व उर्वरित सदस्यांनी ही मागणी धुडकावून लावत कामे सुरूच ठेवण्याचे सांगितले. तर ही कामे कोणत्या निधीतून झाली हे मला माहित नसल्याचे बेजबादारपणाचे उत्तर ग्राम अधिकारी राहुल लोखंडे यांनी दिल्याने सदस्य चांगलेच संतापले. यावरून सरपंच, सदस्य व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली. त्यामुळे याविरोधात मनोहर तायडे रेखा कोळंबे व मंदाकिनी बऱ्हाटे या तीन सदस्यांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

ग्रामपंचायत सदस्य मनोहर तायडे, रेखा कोळंबे, व मंदाकिनी बऱ्हाटे यांनी 30 डिसेंबरला गट विकास अधिकाऱ्यांकडे सरपंच विकास कामे करताना आम्हाला विश्वासात घेत नाहीत. तसेच 15 वा वित्त आयोगाच्या निधीतून गावात कॉक्रीटीकरण, गटार बांधकाम व पेव्हर ब्लॉक बसविण्याची कामे करण्यात आली असून ही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने याची चौकशी होईपर्यंत बिल अदा करू नये अशी अर्जाद्वारे मागणी करण्यात आली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी झालेल्या मासिक सभेत या विषयावरून तक्रारदार सदस्य व सरपंच तसेच ग्रामपंचायत अधिकारी यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक खाडाजंगी झाली. श्री तायडे यांनी या कामांची माहिती मागितली असता ती देण्यात आली नाही. त्यामुळे खंडपीठात जाण्याचा इशारा तक्रारदार तीन सदस्यांनी दिला आहे.

ओल्या कामाची एम बी कशी काय? 

निंभोरा ग्रामपंचायतीचा कार्यकाळ फेब्रुवारीमध्ये संपत असल्याने 15 वा वित्त आयोगाचा मोठा निधी घाईघाईत निकृष्ट दर्जाची कामे करून खर्ची टाकण्याचा प्रयत्न सरपंच उर्वरित सदस्य व ग्राम अधिकाऱ्यांचा आहे. त्यामुळे ओल्या कामांची एम बी पंचायत समितीचे अभियंता अतुल चौधरी यांनी केली असल्याची तक्रार सदस्य मनोहर तायडे यांनी केली आहे. निकृष्ट दर्जाच्या झालेल्या कामांची चौकशी झाल्याशिवाय बिल संबंधित ठेकेदाराला देऊ नये अशी मागणी केली आहे. तर काही लोकांना गावचा विकास सहन होत नसल्याची प्रतिक्रिया सरपंच निर्मला कोळी यांनी दिली.

अनेक कामे संशयाच्या भोवऱ्यात

गेल्या पाच वर्षात 14 वा वित्त आयोग व 25 वा वित्त आयोगातून झालेली अनेक विकासकामे संशयाच्या भोवऱ्यात आहेत. या कामांची जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी झाल्यास सत्यता समोर येईल. निकृष्ट दर्जाची कामे करून शासकीय निधीचा ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी संगणमताने आर्थिक गैरव्यवहार केल्याचा संशय आहे. बांधलेले बाजार ओटे, सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम, केलेली कुपनलिका, पाईपलाईनचे केलेले काम, घनकचरा प्रकल्पच्या नावाखाली केलेला खर्च यासह इतर अन्य कामात मोठा गैरव्यवहार झाल्याची चर्चा आता नागरिकांमध्ये उघडपणे होत आहे. या सर्व कामांची चौकशी झाल्यास खरे चेहरे जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही.