माजी आमदार मनीष जैन यांचे रावेर विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत

पक्षश्रेष्ठी देतील तो आदेश मान्य राहील

माजी आमदार मनीष जैन यांचे रावेर विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत

कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर 

पक्षश्रेठीं आदेश देतील तेथून विधानसभेची निवडणूक लढू, रावेर येथून निवडणूक लढण्यास आपण इच्छुक असल्याचे माजी आमदार मनीष जैन यांनी रावेर दौऱ्यावर आले असता सांगितले. यामुळे रावेर विधानसभा निवडणुकीची तयारी इच्छुकांनी सुरु केली असल्याचे संकेत मिळाले आहेत. 

राज्यात गेल्या वर्षभरात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याने दोन गट झाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर व अमळनेर या  जागांवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाने दावा केला आहे. रविवारी मंत्री अनिल पाटील पुरात वाहून गेल्याने मयत झालेल्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी व नुकसानीची पाहणी करण्यासाठी रावेर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत आमदार मनीष जैन होते. दौरा आटोपल्यावर जैन यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. अजित पवार गटाने राज्यातील ९० जागा लढविण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे. त्यात अमळनेरत व रावेर या दोन्ही जागांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे. त्यादृष्टीने माजी आमदार मनीष जैन यांनी मतदार संघाचा दौरा करीत चाचपणी केली आहे. 

इच्छुकांची संख्या वाढतेय 

रावेर विधानसभेचे विद्यमान आमदार शिरीष चौधरी आहेत. ते काँग्रेस पक्षाचे असून आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ते स्वतः किंवा त्यांचा मुलगा धनंजय याला रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. तर भाजपतर्फे माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल जावळे, डॉ कुंदन फेगडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रंजना पाटील, माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, यांची नावे चर्चेत आहेत. माजी आमदार अरुण पाटील हे देखील इच्छुक असून सध्या ते राष्ट्रवादीत आहेत. तर उद्योजक श्रीराम पाटील यांनी अपक्ष लढण्याची तयारी ठेवली आहे. गेल्या निवडणुकीत ४५ हजार मते मिळवणारे अनिल चौधरी यावेळी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात भाजप-शिंदे गट व अजित पवार गट यांच्या युतीची सत्ता आहे. रावेरची जागा भाजपकडे आहे. मात्र आता अजित पवार गटाने या जागेवर दावा केला असून भाजपने हि जागा अजित पवार गटाला सोडल्यास तेथून माजी आमदार मनीष जैन यांना उमेदवारी मिळणे शक्य आहे. 

रावेर येथून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी मी इच्छुक असून पक्षश्रेठी देतील तो आदेश मान्य राहील. रावेर किंवा जळगाव शहर मतदार संघातून संधी मिळाल्यास निवडणूक लढू. 

---- मनीष जैन माजी आमदार