दणका : रावेरच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना दोन तासात बिडीओंची शोकॉज नोटीस : तीन दिवसात मागितला खुलासा

गट शिक्षणाधिकाऱ्यांवर प्रशासकीय अकार्यक्षमतेचा ठपका

दणका : रावेरच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना दोन तासात बिडीओंची शोकॉज नोटीस :  तीन दिवसात मागितला खुलासा

प्रतिनिधी/रावेर 

शासकीय कार्यालयाची वेळ सकाळी साडेनऊची असतांना तब्बल दोन तास म्हणजेच साडेअकरा वाजेपर्यंत येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालय आज (गुरुवारी) कुलूपबंद होते. तर शैक्षणिक कामानिमित्त आलेले नागरिक दोन ते अडीच तासांपासून कार्यालय उघडण्याच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे होते. हा प्रकार कृषिसेवक न्यूज नेटवर्कने उजेडात आणल्यावर आमदार अमोल जावळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. यागंभीर प्रकाराची गटविकास अधिकारी विनोद मेढे यांनी तात्काळ दखल घेत गटशिक्षणाधिकारी साहेबराव शिंदे यांना अवघ्या दोन तासात शोकॉज नोटीस बजावली आहे. या वृत्ताची आज शिक्षण क्षेत्रात जोरदार चर्चा सुरु होती.

येथील गटशिक्षणाधिकारी साहेबराव शिंदे हे शाळा तपासणीच्या नावाखाली शिक्षकांकडून सक्तीने आर्थिक वसुली करीत असल्याच्या असंख्य तक्रारी तालुक्यातील शिक्षकांच्या आहेत. आज गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला सकाळी ११ वाजता भेट दिली असता हे कार्यालय कुलुपबंद असल्याचे दिसून आले. याची माहिती आमदार अमोल जावळे यांना सांगितल्यावर त्यांनी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी(प्राथमिक) निलेश पाटील व रावेरचे गटविकास अधिकारी विनोद मेढे यांच्याशी संवाद साधून कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.

दोन तासात शोकॉज नोटीस

गटशिक्षणाधिकारी कार्यालय कुलुपबंद असल्याचा सकाळी ११ वाजता आमदार अमोल जावळे यांनी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी निलेश पाटील व बिडीओ विनोद मेढे यांना कॉल करून याबाबत माहिती देत कारवाईच्या सूचना दिल्या. याची श्री मेढे यांनी तात्काळ दखल घेत अवघ्या दोन तासात दुपारी गटशिक्षणाधिकारी साहेबराव शिंदे यांना शोकॉज नोटीस बजावण्याची कारवाई केली आहे. या नोटीसबाबत तीन दिवसात खुलासा सादर करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नोटीसची ही आहेत कारणे

गटशिक्षणाधिकारी शिंदे यांना बजावलेल्या शोकॉज नोटीसमध्ये कार्यालयीन वेळेत अनुपस्थिती, कामकाजातील नियोजनशून्यता व प्रशासकीय अकार्यक्षमता या कारणांचा समावेश आहे. कार्यालयीन कामकाज सुरु होण्याच्या वेळेत पूर्ण विभाग बंद असणे ही गंभीर बाब असून प्रशासकीय अकार्यक्षमतेचे दर्शन घडवते. नियोजनशून्य कामकाजामुळे जनतेच्या तक्रारी वाढल्या असून मोठा असंतोष निर्माण झाला आहे.