कष्ट व आत्मविश्वासाच्या बळावर कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त करता येते : माजी आमदार अरुण पाटील
रावेरला मराठा समाजातर्फे गुणवंतांचा सत्कार
प्रतिनिधी/ रावेर
विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच संस्कारीत होण्याची गरज आहे. कष्ट व आत्मविश्वासाच्या बळावर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते असा विश्वास माजी आमदार अरुण पाटील यांनी व्यक्त केला.
रावेर तालुका मराठा समाज विकास मंडळातर्फे आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी देणगीदार, विशेष प्रविण्य पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा सत्कार व फोटो अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मुक्ताईनगर कृषी महाविद्यालय प्राचार्य संदीप पाटील, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष जे के पाटील, मराठा समाज विकास मंडळाचे अध्यक्ष राहुल पंडीत, सचिव वामनराव पाटील, संचालक अंबादास महाजन, पुंडलिक पाटील, एड ए जे पाटील, संतोष महाजन उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. माजी आमदार श्री पाटील मार्गदर्शन करताना पुढे बोलताना म्हणाले की, शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी स्वतः मधील क्षमता तपासून शिक्षणाची वाट निवडावी. कष्ट व आत्मविश्वासाच्या बळावर निश्चितच यश मिळते. शिक्षणाबरोबरच विद्यार्थांनी संस्कारीत असणे महत्वाचे आहे. उद्योग, नोकरीकडे जाताना शेती व्यवसायाला स्कोप दिला पाहिजे. कष्ट करण्याची तयारी व आत्मविश्वास आणी ध्येय निश्चित असेल तर यश नक्कीच मिळेल असा विश्वास माजी आमदार अरुण पाटील यांनी व्यक्त केला. मराठा समाज विकास मंडळाला देणगी देणाऱ्यांचा यावेळी मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर बी महाजन व शेखर पाटील यांनी केले. कार्यक्रमास दिलीप नामदेव पाटील, युवराज महाजन,डॉ मनोहर पाटील, पी आर पाटील, अर्जुन महाजन, व्ही पी महाजन, सुनिल कोंडे, एस टी पाटील, यांच्यासह मराठा समाज विकास मंडळाचे संचालक व मान्यवर व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कौतुकामुळे कार्यास बळ मिळते : जे के पाटील
विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकल्यास कार्यास बळ मिळते. व्यावसायिक शिक्षणाच्या वाटा विद्यार्थ्यांनी निवडव्यात, ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करावा. समाजातील अनिष्ट प्रथा बंद केल्या पाहिजे. युवक पिढी विघातक वळणावर जात आहे. यासाठी शिक्षणासोबत संस्कार महत्वाचे आहे असे मार्गदर्शन राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष जे के पाटील यांनी केले
ध्येय निश्चित करा : संदीप पाटील
विद्यार्थ्यांनी टाइम मॅनेजमेंट केले पाहिजे. ध्येय निश्चित करून त्यानुसार काम केल्यास यश हमखास मिळते. आपण निवडलेल्या क्षेत्रात आलेल्या अपयशाने खचून न जाता पुन्हा प्रयत्न करा. असे आवाहन मुक्ताईनगर कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप पाटील यांनी केले.