व्यवसायात प्रामाणिकपणा असल्यास उद्योजक होणे शक्य

वितरकांच्या मेळाव्यात श्रीराम पाटील यांचा विश्वास

व्यवसायात प्रामाणिकपणा असल्यास उद्योजक होणे शक्य

कृषीसेवक न्यूज नेटवर्क / जळगाव : 

व्यवसायात प्रामाणिकपणे जबाबदारीने काम केल्यास व्यावसायिकाची वाटचाल उद्योजकतेकडे होईल, त्यासाठी श्रीराम उद्योग समुह संपूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन श्रीराम उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीराम पाटील यांनी दिले. कृषिदिनानिमित्त आयोजित वितरकांच्या मेळाव्यात मागदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संचालक प्रमोद पाटील,  संचालक अभिषेक पाटील, संचालक कुश पाटील, महाव्यवस्थापक धनराज चौधरी, सीईओ सतिष शेकडे, एरिया सेल्स मॅनेजर संजय पूणतकर, देवेंद्र सोनवणे, सिद्धांत जुगेन्द्र  व सुहास गायकवाड उपस्थित होते.

पाटील पुढे म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात प्रगती करीत असताना दुसऱ्याची रेषा न पुसता आपली रेषा कशी वाढवता येईल याचाच विचार करावा. श्रीराम ठिबक हे उत्तम गुणवत्ता, माफक दर, वेळेत मालपुरवठा, विक्री पश्चात तत्पर सेवा तसेच कुशल, अनुभवी, विश्वासू सहकारी व चाणाक्ष वितरक याच्या पाठबळावर कंपनी आज देशातील शेतकर्‍यांच्या विश्वासाला पात्र ठरली आहे. शेतकर्‍याला विक्री पश्चात दिलेल्या सेवेमुळे ग्राहक जोडला जातो. व त्यातून साखळी तयार होते. व्यवसायाकडून उद्योगाकडे वाटचाल करण्याचा हा मार्ग आहे.  

वितरकांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावे 

शासनाने शेतकरी हितासाठी ठिबक सिंचनाच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा लाभ शेतकर्‍यांना देण्यासाठी वितरकांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावे असे आवाहन पाटील यांनी केले. तेथेच ऑनलाईन अर्ज भरून घेत त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा. यातूनच शेतकरी सुखी आणि समृध्द होईल. यावेळी सूर्यकांत पाटील, चंद्रकांत बाविस्कर, शरद गोरेपाटील, विजय पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले. वितरक सोपान पाटील यांची रावेर पिपल्स  बँकेवर तर वितरक चंद्रकांत बाविस्कर खरेदी विक्री संघावर निवडून आल्याने त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन गणेश पाटील यांनी केले. मेळाव्याच्या व्यवस्थापनाचे सहकार्य वरिष्ठ व्यवस्थापक अनंत बागुल, सहा.व्यवस्थापक सुरज कोलते, कार्मिक अधिकारी ईश्वर पाटील व सहकाऱ्यांनी केले.