टिश्यूकल्चर कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची शेतकऱ्यांची मागणी

रावेरला ३ ऑक्टोबरला शेतकरी संघर्ष समितीतर्फे रास्ता रोको

प्रतिनिधी/रावेर

केळी रोपांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या प्रयोगशाळेची व निर्मिती झालेल्या रोपांची केंद्रीय कृषी मंत्रालय व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्या तज्ज्ञाकडून चौकशी करण्याची मागणी शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. यात दोषी आढळणाऱ्या कंपन्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. हवामानावर आधारीत केळी फळ पीक विम्याची व सीएमव्हीने बाधित झालेल्या क्षेत्राची रक्कम त्वरित मिळावी या मागण्यासाठी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघर्ष समितीतर्फे ३ ऑक्टोबरला रावेरला रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

केळीवरील सीएमव्हीमुळे नुकसान होत असलेल्या शेतकऱ्यांची येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बैठक झाली. या बैठकीत सीएमव्हीमुळे बाधित झालेल्या केळी बागांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. याची दखल केंद्रीय कृषी मंत्रालय व राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राने घेण्याची मागणी करण्यात आली.  

३ ऑक्टोबरला रास्ता रोको

हवामानावर आधारित केळी फळ पीक विम्याची तसेच सीएमव्ही बाधित क्षेत्राची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, यावर्षी सीएमव्ही बाधित झालेल्या क्षेत्राचे त्वरित पंचनामे करावेत व टिश्यूकल्चर रोपे निर्मिती करणाऱ्या व शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत असे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. या मागण्यासाठी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघर्ष समितीतर्फे येत्या ३ ऑक्टोबरला रावेर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी निवेदन स्वीकारले.

बैठकीला यांची होती उपस्थिती

या बैठकीला माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, उद्योजक श्रीराम पाटील, बाजार समिती सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील, संचालक डॉ राजेंद्र पाटील, गणेश महाजन, सैय्यद असगर, जयेश कुयटे, विलास चौधरी, पी आर पाटील, रावेर तालुका ऍग्रो डीलर असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, दीपक पाटील, विनोद पाटील यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.