मुंबईतून फोन आणि नाव निश्चित : रावेरला बाजार समितीच्या सभापतीपदी सचिन पाटील, तर उप सभापतिपदी योगेश पाटील बिनविरोध

रावेरला बाजार समिती सभापती निवडणूक

मुंबईतून फोन आणि नाव निश्चित  : रावेरला बाजार समितीच्या सभापतीपदी सचिन पाटील, तर उप सभापतिपदी योगेश पाटील बिनविरोध

प्रतिनिधी / रावेर 

येथील बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीचे सचिन पाटील तर उपसभापती पदी काँग्रेसचे योगेश पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर सभापती पदाची प्रथम संधी राष्ट्रवादीला देण्याचे निश्चित झाले होते. मात्र राजेंद्र चौधरी व सचिन पाटील यांच्यात रस्सीखेच सुरु होती. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे हा तिढा सुटू शकला नव्हता. त्यांमुळे त्यांनी हा प्रश्न प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर सोपवला होता. अखेर प्रदेशाध्यक्षांनी सचिन पाटील यांच्या नावाची शिफारस केल्याने त्यांची सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर आमदार शिरीष चौधरी यांनी सभापती व उप सभापतींचे शाल बुके देऊन अभिनंदन केले. 

सभापती व उपसभापती पदासाठी बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह गवळी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी सभापती पदासाठी सचिन पाटील, तर उपसभापती पदासाठी योगेश पाटील यांचे प्रत्येकी एक अर्ज आल्याने त्यांची या पदांवर बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. सभेला डॉ राजेंद्र पाटील, योगीराज पाटील, मंदार पाटील, राजेंद्र चौधरी, प्रल्हाद पाटील, पांडुरंग पाटील, पितांबर पाटील, गणेश महाजन, सय्यद असगर, रोहित अग्रवाल, विलास चौधरी, मनीषा पाटील, सविता पाटील, पंकज पाटील, जयेश कुयटे, सिकंदर तडवी उपस्थित होते, 

निवडीनंतर माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, किशोर पाटील, प्रवीण पंडित यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित सभापती व उप सभापतींचे अभिनंदन केले.