ठिबक ऍटोमेशनसाठी शेतकऱ्यांना मिळणार अनुदान : तज्ज्ञ समितीत जैन इरिगेशनला स्थान
पाणी व मजूर टंचाईवर उपाययोजना
कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर
दिवसेंदिवस पाण्याचा होणारा मोठ्या प्रमाणावरील वापर व जाणवणारी मजुरांची टंचाई यावर मात करण्यासाठी ठिबक सिंचनात ऍटोमेशन सिस्टीमचा (स्वयंचलित प्रणाली) वापर करण्याचा निर्णय कृषी मंत्रालयाने घेतला आहे. यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. ऍटोमेशनचा अधिक विस्तार करण्यासाठी कृषी आयुक्त कार्यालयाने तज्ज्ञाची समिती गठीत केली असून यात जैन इरिगेशनच्या तांत्रिक प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे.
शेतीत हरित क्रांती निर्माण करणाऱ्या ठिबक सिंचन प्रणालीत ऍटोमेशन सिस्टीमचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रणालीमुळे आवश्यक तेवढेच पाणी व खते पिकांना देता येत असून पाण्याची बचत होते. तसेच हि यंत्रणा स्वयंचलित असल्याने भविष्यातील मजुर टंचाईचा प्रश्न काही अंशी सुटणार आहे.
हेक्टरी मिळेल ४० हजार अनुदान
ऍटोमेशन सिस्टीमचा लाभ बहुसंख्य शेतकऱ्यांनी घ्यावा यासाठी हि सिस्टीम बसवणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यासाठी कमाल मर्यादा लावण्यात आलेली नाही.
तज्ज्ञ समिती स्थापन
कृषी आयुक्त कार्यालयाने ऍटोमेशन सिस्टीमचा अधिक विस्तार तसेच अनुदान यांच्या तांत्रिक रूपरेषा ठरविण्यासाठी फलोत्पादन सह संचालक अशोक किरनळी यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. या समितीत शेतकरी प्रतिनिधी म्हणून सातारा जिल्ह्यातील राजेंद्र डेरे चारही कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी तसेच कृषी विद्यावेत्ता विभागाच्या प्रतिनिधींना समावेश आहे. याशिवाय ठिबक क्षेत्रातीळ अग्रगण्य जैन इरिगेशनच्या प्रतिनिधींना या समितीत स्थान देण्यात आले आहे.