पाडळे-गंगापुरी रस्त्याची दुर्दशा : शेतमालाची वाहतूक करतांना शेतकऱ्यांसमोर अडचणी

लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी

पाडळे-गंगापुरी रस्त्याची दुर्दशा : शेतमालाची वाहतूक करतांना शेतकऱ्यांसमोर अडचणी

प्रतिनिधी / रावेर

तालुक्यातील पाडळे येथून गंगापुरी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून हा रस्ता शेवटच्या घटका मोजत आहे. या रस्त्यावरून शेतमालाची वाहतूक करतांना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोकप्रतिनिधी व शासनाने याची दखल घेवून या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी पाडळे येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

पाडले गावापासून गंगापुरी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या दुतर्फा सुमारे ५०० एकरपेक्षा अधिक बागायती शेती आहे. मात्र या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पाडले आहेत. तर संपूर्ण रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असल्याने कापलेल्या केळीची वाहतून करतांना अडचणी निर्माण होत आहे. शेतात कापलेली केळी ट्रक्टरद्वारे गावापर्यंत आणून त्यानंतर ट्रकमध्ये भरावी लागते. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाया जात असून मालाचा दर्जा घसरतो व वाहतूक भाड्याचा भुर्दंड बसतो. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याची दखल घेवून या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी पाडले येथील शेतकरी मयूर कोंडे, संतोष महाजन, गणेश महाजन, शरद महाजन, भरत पाटील, अनिल महाजन, पंकज महाजन, दिलीप महाजन, प्रदीप महाजन, कालू तडवी यांच्यासह या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. गंगापुरी धरण परिसर निसर्गरम्य असल्याने पर्यटनस्थळ म्हणून वनविभागाने विकास केल्यास पर्यटकांची संख्या वाढून शासनाला या माध्यमातून अधिकचे उत्पन्न मिळू शकेल.