खतांची लिंकिंग करणाऱ्या युरिया खत कंपनीवर बहिष्कार

रावेर ऍग्रो डीलर्स असोसिएशनचा निर्णय

खतांची लिंकिंग करणाऱ्या युरिया खत कंपनीवर बहिष्कार
प्रतिनीधी/ रावेर-
खरीप हंगामात युरिया खतासोबत खत निर्माण करणाऱ्या कंपन्याकडून इतर अतिरिक्त खतांची लिंकिंगद्वारे विक्री केली जाते. यामुळे कृषि केंद्र चालकांची कोंडी होते. लिंकिंगद्वारे युरियाची विक्री करणाऱ्या युरिया खत निर्माण करणाऱ्या कंपन्यांच्या युरियावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय रावेर ऍग्रो डीलर्स असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला आहे.  
 युरियासोबत इतर खते, कीटकनाशके, महागडी विद्राव्य खते जबरदस्ती कंपन्यांकडून लिंकिंग केली जातात. असे केल्यास रावेर तालुक्यातील कोणताही खत विक्रेता युरिया घेणार नसल्याचा निर्णय कृषि केंद्र चालकांनी घेतला आहे. खत लिंकिंगसाठी कंपन्यांकडून येणाऱ्या दबावाबाबत ठोस निर्णय घेण्याबाबत जळगाव जिल्हा ऍग्रो डीलर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष तथा माफदा अध्यक्ष  विनोद तराळ यांना रावेर संघटनेतर्फे  तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांनी निवेदन दिले.
गेल्या महिनाभरात रावेर तालुक्यात गारपीट, वादळी वारे, बेमोसमी पाऊस अशा नैसर्गिक आपत्तींनी व  केळीच्या कमी झालेल्या बाजारभावाने शेतकरी त्रस्त आहे. त्यातच रासायनिक खत कंपन्या युरियासोबत मोठ्या प्रमाणावर लिंकिंग देत असल्याने तालुक्यातील खत विक्रेत्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते .तर युरियासोबत लिंकिंग न घेतल्यास खत मिळत नाही.त्यामुळे दोन्ही बाजूंनी खतविक्रेत्यांची कोंडी होत असून त्यापेक्षा अशा युरियाला खरेदी न करता त्या रॅकवर आम्ही बहिष्कार टाकू अशी माहिती रावेर ऍग्रो डीलर्स असोसिएशनचे  तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांनी दिली.लिंकिंगचा त्रास असाच सुरू राहिल्यास पूर्ण रावेर तालुक्यातील खत विक्रेते आपले पॉस मशीन कृषी विभागाकडे परत देतील अशी माहिती ही निवेदनात देण्यात आली आहे.या बैठकीस रावेर ऍग्रो डीलर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे, उपाध्यक्ष एकनाथ महाजन,सचिव युवराज महाजन,ज्येष्ठ उद्योजक चंद्रकांत अग्रवाल, सुनिल कुलकर्णी,डॉ जी एम बोंडे,जितेंद्र महाजन,प्रविण पाटील,जितेंद्र महाजन,रवींद्र बारी,अमोल लोखंडे,प्रदीप महाजन,गणेश महाजन,नंदू पाटील,जितेंद्र पाटील,राहुल शिंदे,यादवेंद्र माळी, वैभव चौधरी,विशाल पाटील,नितीन पाटील,धीरज पाटील यांसह अन्य  विक्रेते उपस्थित होते