रावेर तालुक्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांना लगाम कोण लावणार ?
बिनबोभाट सुरु आहेत अवैध धंदे
कृषीसेवक न्यूज नेटवर्क/रावेर
रावेर हा महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवरील तालुका असल्याने गुन्हेगारांचे एक प्रमुख केंद्र बनत चालले आहे. मध्यप्रदेशातील सराईत गुन्हेगार रावेर तालुक्यात येऊन दहशत निर्माण करण्याच्या काही घटना तालुक्यात खानापूर, विवरा व सावदा येथे घडलेल्या आहेत. तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्याची जबाबदारी रावेर, निंभोरा व सावदा या पोलीस ठाण्यांवर आहे. मात्र या तिन्ही पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बिनबोभाटपणे सर्रास अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. कार्यक्षेत्रातील गावात कायदा, सुव्यवस्था व शांतता टिकवून ठेवण्यासाठी या तिन्ही पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून कसोशीने प्रयत्न केले जात असले तरी याच कार्यक्षेत्रातील गावांमध्ये सुरु असलेल्या अवैध धंद्यांना लगाम कोण लावणार ? असा प्रश्न जनतेमधून विचारला जात आहे.
रावेर तालुक्याचा विस्तार पाहता तालुक्यात रावेर, निंभोरा व सावदा येथे पोलीस ठाणे कार्यरत आहेत. तालुक्याच्या पूर्वेला व उत्तरेला मध्यप्रदेश असून या राज्यातून गुन्हेगारांचा कायम तालुक्यात व जिल्ह्यात वावर असतो. मध्यप्रदेशातील गुन्हेगारी प्रवृत्तीला पोलिसांनी वेळीच आळा न घातल्यास तालुक्यात भविष्यात अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जुगार अड्डयावर हल्ले, मात्र पोलीस अनभिज्ञ
रावेर तालुक्यात निंभोरा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पन्नीची गावठी दारू, सट्टा व जुगाराचे अड्डे, गुटख्याची राजसोसपणे वाहतूक व विक्री असे अवैध धंदे खुलेआमपणे सुरु आहेत. याची या पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी गणेश धुमाळ यांना माहिती नसावी हि सर्व सामन्यांना न पटणारी बाब आहे. काही महिन्यापूर्वी निंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात सुरु असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर रात्री हल्ल्याचा प्रकार घडला होता. यात गुन्हेगारांनी जुगाऱ्यांना मारहाण करीत ऐवज लांबविला होता. मात्र या बाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली होती. तर घडलेल्या या घटनेची एपीआय धुमाळ यांना माहिती विचारली असता घटनेची मला माहिती नाही, माहिती घेतो असे उत्तर देत माहिती व गुन्हा दडपण्याचा प्रकार घडलेला आहे. खिर्डी, निंभोरा, ऐनपूर निंबोल व तापी काठावरील गावांमध्ये गावठी दारूची विक्री सर्रास सुरु आहे. याबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी जुगाराचे अड्डे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरु आहेत. येथील एका जुगाराच्या अड्ड्यावर काही महिन्यापूर्वी सशस्त्र हल्ला झाला होता. यात हल्लेखोरांनी जुगाऱ्यांना मारहाण केल्याने एक जण जखमी झाला होता. तर हल्लेखोरांनी रोख रक्कम लुटून नेली होती. मात्र याची सावदा पोलिसात कोणतीही नोंद त्यावेळी करण्यात आली नाही. सावदा पोलीस ठाण्याचे एपीआय जालिंदर पळे यांनी सावदा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सुरु असलेल्या अवैध धंद्यांना लगाम लावावा अशी मागणी आहे. मध्य प्रदेशच्या सीमेवर खानापूर, चोरवड जवळ सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर दोन वेळा हल्ल्याचा प्रकार घडलेला आहे. हल्लेखोर मध्यप्रदेशातील असल्याची त्यावेळी नागरिकांमध्ये चर्चा होती. जुगार अड्ड्यांवर होणारे हल्ले भविष्यात अनुचित प्रकाराचे निमित्त होउ शकते.
अवैध धंद्यांना लगाम लावावा
रावेर तालुक्यातील तिन्ही पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गावात देशी विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक व विक्री, हातभट्टीची गावठी दारूची विक्री, गुटख्याची वाहतूक व विक्री , मटक्याचे व जुगाराचे अड्डे बिनबोभाटपणे सुरु आहेत. याला कुणाचा वरदहस्त आहे हे जनतेला सांगण्याइतपत जनता दूधखुळी नाही. याशिवाय तालुक्यात अवैध प्रवाशी वाहतूक, वाळूची वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने सुरु असल्याची चर्चा या व्यावसायिकांमध्ये उघडपणे केली जाते. पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांचा गुन्हेगारांवर वाचक आहे. त्यांनी शहर व परिसरात सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी केलेले प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहेत. त्यामुळे शहर व कार्यक्षेत्रातील गावात गुन्ह्यांचे प्रमाण निश्चितच घटले आहे. मात्र अवैध धंद्यांच्या माध्यमातून गुन्हेगारांनी डोके वर काढण्यापूर्वी त्यांचा बीमोड करण्याची गरज आहे. रावेर तालुक्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांना पोलिसांनी लगाम लावावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, डीवायएसपी डॉ कुणाल सोनवणे यांनी रावेर तालुक्यातील अवैध धंद्यांना आळा बसण्यासाठी कार्यवाही करावी अशी जनतेची अपेक्षा आहे.