पोलिसांना सलाम...अवघ्या पाच मिनिटात परिस्थिती नियंत्रणात : रावेरला मिरवणुकीवर दगडफेक प्रकरणी १४ जणांना अटक, शहरातील व्यवहार पूर्वपदावर
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : एसपींचे आवाहन
प्रतिनिधी / रावेर
अयोध्येत राममंदिर लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात निघालेल्या भव्य मिरवणुकीवर समाजकंटकांनी भोईवाडा परिसरात दगडफेक केली. त्यामुळे यावेळी एकच गोंधळ उडाला. यावेळी झालेल्या दगडफेकीत तीन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीने समयसूचकता दाखवत अवघ्या पाच मिनिटात परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून १४ जणांना अटक करण्यात आली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच सर्व कार्यक्रम व व्यवहार सुरळीत ठेवण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार यांनी केले आहे. रात्रीपासून शहरातील विविध भागात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्री रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने येथील नागरिकांतर्फे भव्य शोभयात्रा काढण्यात आली होती. या यात्रेत महिला पुरुषाची उपस्थिती लक्षणीय होती. छ्त्रपती शिवाजी महाराज चौकातून ही मिरवणूक भोईवाड्याकडे जात असताना या ठिकाणी काही समाज कंटकांनी मिरवणुकीच्या दिशेने दगडफेक केली. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. मात्र या ठिकाणी बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ, पीएसआय सचिन नवले, तुषार पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ नागरिकांना मिरवणुकीतून सुरक्षित बाहेर काढले. तर त्याचवेळी पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेत काही समाजकंटकांना ताब्यात घेतले. त्यामुळे अवघ्या पाच मिनिटात परिस्थिती नियंत्रणात आल्याने पुढील अनर्थ पोलिसांच्या समयसूचकता व तत्परतेने टळला आहे. तसेच यावेळी रावेर शहरातील नागरिकांनी संयम राखत समजूतदारपणा घेतल्याने पोलिसांना परिस्थितीवर त्वरित नियंत्रण मिळवता आले आहे.
घटनास्थळी एसपीची भेट
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार, प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्यासह अधिकाऱ्यांनी रात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच पोलीसांना सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच आजचे सर्व कार्यक्रम व व्यवहार सुरळीत सुरू ठेवावे असे आवाहन पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी नागरिकांना केले आहे.
१४ जणांना अटक
मिरवणुकीवर दगडफेक प्रकरणी सुमारे तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी उर्वरित आरोपींचा शोध सुरु असून त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. दरम्यान या घटनेत तीन पोलिस कर्मचाऱ्यांना दगड लागल्याने त्यांना मुक्कामाऱ बसला आहे.
पीएसआय तुषार पाटील यांनी रोखला जमाव
दगडफेकीने मिरवणुकीत गोंधळ उडताच मिरवणुकीच्या दिशेने जमाव चालून येत असल्याचे मिरवणुकीत बंदोबस्तासाठी उपस्थित असलेले पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील यांच्या नजरेने हेरले. व क्षणात ते आक्रमक होत जमावाच्या दिशेने चालून पुढे गेले. यामुळे मिरवणुकीच्या दिशेने पुढे येणारा जमाव माघारी फिरवण्यात पीएसआय तुषार पाटील यांना यश आले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत झाली.
मागील गुन्ह्यात सहभाग असल्यास तडीपार : नखाते
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मागील काही गुन्ह्यात या आरोपींचा सहभाग असल्याचे दिसून आल्यास त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली. सीसीटीव्ही फुटेफुटेज तपासून निष्पन्न झालेल्या आरोपीना अटक करण्यात अली आहे.
पोलिसांच्या कार्याला सॅल्युट...
शांततेत सुरू असलेल्या शोभायात्रेत वातावरण गढूळ करण्याचा काही समाजकंटकांनी प्रयत्न केला. मात्र यावेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी समाजकंटकांचे हे कृत्य त्वरीत हाणून पाडले. अन्यथा घटनेचे लोण शहरांतील इतर भागात पोहचण्यास वेळ लागला नसता. शहरात शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजाचे रक्षण करणाऱ्या पोलिस अधिकारी,कर्मचारी व होमगार्ड बांधवांना मनापासून सलाम...सॅल्युट...
शहरावर पोलिसांचे लक्ष : एपीआय अडसूळ
घटनेनंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरु होते. कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. घटनेच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरावर पोलिसांचे बारीक लक्ष असून शांतता भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
--- आशिषकुमार अडसूळ सहाय्यक पोलीस निरीक्षक, रावेर