बातमी मागची बातमी : भाजपच्या रावेर तालुकाध्यक्ष निवडीवेळी कार्यकर्त्याचा गोंधळ
जिल्हाध्यक्ष अमोल जावळे उद्विग्न
कृषीसेवक न्यूज नेटवर्क / रावेर
भारतीय जनता पक्षाच्या रावेर तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मंगळवारी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इच्छुकांची बैठक येथील बऱ्हाणपूर रस्त्यावरील मंगलम लॉनवर आयोजित केली होती. मात्र या बैठकीत काही कार्यकर्त्यांनी आरोप केल्याने गोंधळ निर्माण झाला. यामुळे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे कमालीचे उद्विग्न झाले.
भाजपच्या रावेर तालुकाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी आयोजित केलेल्या बैठकीला प्रदेश सचिव अरुण मुंडे, अजय भोळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश धनके, सचिन पानपाटील, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, लोकसभा क्षेत्र प्रमुख नंदकिशोर महाजन, भाजप युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर उपस्थित होते. या बैठकीत व्यासपीठावरील मान्यवर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना एका कार्यकर्त्याने केला.जिल्ह्यावर तीन अध्यक्ष नेमले तसे तालुक्यावर दोन अध्यक्ष नेमा अशी मागणीही या कार्यकर्त्यांनी केली. कार्यकर्त्यांच्या या भूमिकेमुळे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे चांगलेच उद्विग्न झाले. मात्र व्यासपीठावरील मान्यवरांनी त्यांची समजूत काढली. हा सर्व प्रकार बैठकीला उपस्थित असलेले प्रदेश सचिव अरुण मुंडे व अजय भोळे यांच्यासमोर घडला आहे. खासदार खडसे यांच्या अनुपस्थितीबाबत कार्यकर्त्याने प्रदेश सचिवांसमोर भावना व्यक्त केल्याने पक्षात रावेर तालुक्यात सर्व काही आलबेल आहे असे म्हणता येणार नाही. त्यातून गटबाजीचे दर्शन घडले आहे. बैठकीत घडलेल्या प्रकाराची भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये कुजबुज सुरु आहे.
मी माहेरी होते : खासदार खडसे
बैठकीच्या अनुपस्थितीबाबत खासदार रक्षा खडसे यांच्यांशी संपर्क साधला असता रक्षाबंधनासाठी माहेरी होते असे खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले.
असा कोणताही प्रकार घडला नाही : जावळे
बैठकीत झालेल्या प्रकाराबाबत जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्याशी संपर्क साधून विचारले असता असा कोणताही प्रकार झालेला नाही.पक्ष संघटनेनुसार व पक्षाच्या नियमानुसार बैठक बोलावली होती. इच्छुकांच्या मुलाखती वरिष्ठानी घेतल्या आहेत असे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी सांगितले.