एमसीएल उद्योग जैवइंधनाच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना सहभागी करणार : ३६ ग्राम उद्योजकांचा सन्मान
रावेरला जैवइंधन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
प्रतिनिधी / रावेर
पेट्रोल, डिझेलला पर्याय म्हणून जैवइंधन तयार करण्याच्या प्रक्रिया उद्योगात शेतकऱ्यांना सहभागी करण्याचा प्रयत्न मुंबईच्या एमसीएल उद्योगातर्फे सुरु आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील असा विश्वास या उद्योगाचे वरिष्ठ अधिकारी निलेश आढे यांनी व्यक्त केला.
मीरा क्लीनफ्युलस लिमिटेड (एमसीएल) संलग्न विजयीभव क्लिनफ्युलस व विजय पाटील रावेर किसान ऑरगॅनिक प्रोड्युसर कंपनीतर्फे जागतिक जैवइंधन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन करून करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर एमसीएलचे वरिष्ठ अधिकारी गजेंद्र सोनावणे , रावेर किसान ऑरगॅनिक प्रोड्युसर कंपनीचे विजय पाटील, दीपक पाटील (यावल), पराग शिंदे (मुक्ताईनगर), दीपक चौधरी(भुसावळ), सुनील जैन (एरंडोल), प्रभाकर महाजन(बऱ्हाणपूर ), यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सध्या देशात वाहनातील इंधनामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदुर्षण वाढले आहे. एमसीएल यावर पर्याय म्हणून नेपियर गवतापासून जैवइंधन व इको फ्रेंडली प्रॉडक्ट तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. पर्यावरण संरक्षण, रोजगार, शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, शाश्वत उत्पन्न व ऊर्जा या पंचसूत्रीवर हि कंपनी काम करीत आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी करून घेत त्यांना सक्षम बनविण्याचा प्रयत्न आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्तविक विजय पाटील रावेर किसान ऑरगॅनिक प्रोड्युसर कंपनीचे उमेश पाटील यांनी केले.
३६ ग्राम उद्योजकांचा सन्मान
या कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या रावेर तालुक्यातील ३६ ग्राम उद्योजकांचा सपत्नीक कंपनीतर्फे मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.