रावेर तालुक्यात अतिवृष्टीने 11 घरांची पडझड, 5 बकऱ्या ठार, 121 हेक्टरवरील पिकांचे नुकसान : नुकसानीचे पंचनामे करण्याच्या आमदार अमोल जावळे यांच्या प्रशासनाला सूचना
अजंदा गावाचा तुटला होता संपर्क

प्रतिनिधी/ रावेर
प्रदीर्घ खंडानंतर रावेर तालुक्यात पावसाने रविवारी रात्री जोरदार हजेरी लावली. यामुळे नागझिरी नदीला पूर आल्याने रावेर शहरासह रामजीपूर, बक्षीपूर गावात पाणी घुसल्याने नागरिकांची धांदल उडाली. रावेर अजंदा रस्त्यावर या नदीचे पाणी आल्याने हा रस्ता दुपारपर्यंत वाहतुकीसाठी बंद झाला होता. या पावसामुळे 5 बकऱ्या ठार झाल्या असून 11 घरांची पडझाडं झाली आहे. तर 121 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. निवासी उप जिल्हाधिकारी अर्चना मोरे, प्रभारी प्रांतधिकारी गायकवाड तहसीलदार बी ए कापसे यांनी नुकसानीची पाहणी केली.आमदार अमोल जावळे यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
रविवारी रात्री वादळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागझिरी नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील काठावरील घरात पाणी घुसले होते. तसेच या पुराच्या पाण्यात शहरातील कॉलनी भागात पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी वाहून गेली होती. युद्धपातळीवर काम करून संध्यकाळपर्यंत जलवाहिनी जोडण्यात आली आहे. दरम्यान पुराचे पाणी रावेर-अजंदा रस्त्यावर आल्याने अजंदा व पुढे जाणाऱ्या गावांची वाहतूक खंडीत झाली होती. रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी विजेचे खांब उन्माळून पडले असून तारा तुटल्याने विजपुरवठा खंडीत झाला होता. आज रहिवाशी भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. निवासी उप जिल्हाधिकारी अर्चना मोरे, प्रभारी प्रांतधिकारी गायकवाड, तहसीलदार बी ए कापसे यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. रावेर येथील सरदार जी जी हायस्कुलमधील काही झाडे रात्रीच्या वादळात उन्मळून पडली आहेत. त्यामुळे विध्यार्थ्यांना अडचणींतून वाट काढावी लागत आहे. रावेर-भाटखेडा रस्त्यावरील मोरी पुलाजवळ रस्त्याचा काही भाग खचला असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकेदायक ठरला आहे.
11 घरांची पडझाडं 5 बकऱ्या ठार
या पावसाने विवरे बुद्रुक(1), जुनोना(1), केऱ्हाला खुर्द(1), उटखेडा(1), बक्षीपूर(3), गोलवाडे(1), शिंगाडी(1), लालमाती(2) या गावातील 11 घरांची पडझड झाली आहे. तर बक्षिपूर येथील नरेंद्र किसन महाजन यांच्या 5 बकऱ्या ठार झाल्याने त्यांचे पशुधनाचे नुकसान झाले आहे.
162 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान
या पावसाने रावेर तालुक्यातील 162 शेतकऱ्यांचे 121 हेक्टरवरील मका कापूस व केळीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने वर्तवला आहे. यात खानापूर, चोरवड, अहिरवाडी, केऱ्हाळा खुर्द, केऱ्हळा बुद्रुक, रसलपूर, मोरगाव खुर्द, अजंदे, नांदूरखेडा, निंबोल या गावांच्या शेत शिवरातील केळी, मका व कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे.