रावेर ग्रामीणचा पाच दिवसापासून पाणी पुरवठा खंडीत : नागझिरीच्या पुरात पाईप लाईन वाहून गेल्याचा परिणाम

भर पावसाळ्यात शहरात पाणी टंचाई

रावेर ग्रामीणचा पाच दिवसापासून पाणी पुरवठा खंडीत : नागझिरीच्या पुरात पाईप लाईन वाहून गेल्याचा परिणाम

प्रतिनिधी/ रावेर

रावेर ग्रामीण पाणीपुरवठा योजनेवरून शहरातील कॉलनी भागात होणारा पाणीपुरवठा पाईप लाईन फुटल्यामुळे चार दिवसापासून झालेला नाही. त्यातच भर म्हणून रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नागझिरी नदीला मोठा पूर आला. या पुरात जुना सावदा रोडवरील पुलाजवळ ग्रामीणला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन पुरात वाहून गेली आहे. त्यामुळे आणखी दोनतीन दिवस पाणी पुरवठा होण्याची चिन्हे दिसत नाहीत. नगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी श्री मुठाळ यांनी वाहून गेलेल्या पाईप लाईनची आज सकाळी पाहणी केली. मात्र पाऊस सुरु असल्याने पाईपलाईन जोडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होत आहे. ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी नागरिकांवर भटकंतीची वेळ आली आहे.

शहरातील उटखेडा रोड, जुना सावदा रोड, अष्टविनायक नगर, श्रीकृष्ण नगर, तिरुपती नगर, जि एस कॉलनी व इतर कॉलनी भागात रावेर ग्रामीण पाणीपुरवठा योजनेवरून पाणी पुरवठा केला जातो. मात्र चार दिवसापूर्वी स्टेशनवरील ट्यूबवेल पासून टाकीपर्यंत येणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने या भागातील पाणी पुरवठा खंडित झाला होता. काल या जलवाहिनीची जोडणी करून पाणी पुरवठा सुरळीत केला. मात्र रात्री जोरदार पाऊस झाल्याने नागझिरी नदीला आलेल्या पुरात जुना सावदा रोडवरील पुलाजवळ पुराच्या पाण्यात ही जलवाहिनी वाहून गेली आहे. त्यामुळे आणखी दोन तीन दिवस पाणी पुरवठा होऊ शकणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.

पावसाळ्यात पाणी टंचाई

शहरातील कॉलनी भागाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा फुटल्याने गेल्या पाच दिवसापासून नागरिकांना पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. वाहून गेलेली जलवाहिनी जोडण्याचे काम नगरपालिकेने युद्ध पातळीवर करून पाणी पुरवठा पूर्ववत सुरळीत करावा अशी नागरिकांची मागणी आहे. 

शहराच्या मुख्य जलवाहिनीला धोका

शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी जुना सावदा रोडने फिल्टर हाऊस पर्यंत गेलेली आहे. मात्र या जलवाहिनीला नागझिरी नदीच्या पुराचा तडाखा बसला आहे. या वहिनीला नदीपात्रात आधारासाठी दिलेले पिल्लर पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. तर पूर्वेकडील पिल्लरला मोठा तडा गेला असून नदीला पुन्हा पूर आल्यास हा पिल्लर वाहून जाण्याची अधिक शक्यता आहे. नगरपालिकेने याची वेळीच दक्षता घेण्याची गरज आहे.