उद्योग : महिलांना प्रक्रिया उद्योग क्षेत्रात मोठी संधी : महेश महाजन
पिंप्रीनांदू येथे स्मित ऑरगॅनिक उद्योगाचा शुभारंभ
कृषीसेवक न्यूज नेटवर्क/ मुक्ताईनगर
पिकांचे केवळ उत्पादन न करता उत्पादित शेतमालावर प्रक्रिया करून त्याची विक्री करावी. प्रक्रिया उद्योगात मोठी संधी असून महिलांनी याकडे वळावे असे आवाहन पाल ता रावेर येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व शास्त्रज्ञ महेश महाजन यांनी केले.
पिंप्रीनांदू ता मुक्ताईनगर येथील स्मित ऑरगॅनिक फार्म फ्रेश या फळे, भाजीपाला निर्जलीकरण व मसाला उत्पादन उद्योगाचा शुभारंभ महेश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पाल केव्हीकेचे शास्त्रज्ञ डॉ धीरज नेहेते, साप्ताहिक कृषीसेवकचे संपादक कृष्णा पाटील उपस्थित होते. प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजने अंतर्गत जिल्हा कृषी अधीक्षकांच्या मार्गदशनात हा उद्योग सौ अश्विनी विजय पाटील यांनी सुरु केला आहे. यासाठी पाल केव्हीकेचे शास्त्रज्ञ व या योजनेचे जिल्हा समन्वयक विकास कुंभार यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मुक्ताईनगर एचडीएफसी बँकेचे अधिकारी, गावातील प्रगतिशील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत विजय पाटील यांनी केले.