जैन इरिगेशनचे शेती संशोधन क्षेत्रात दमदार पाऊल : जगात सर्वप्रथम केली कॉफी, काळी मिरी टिश्यूकल्चर रोपांची निर्मिती

शेतकऱ्यांसाठी विकसित केले आधुनिक तंत्रज्ञान

जैन इरिगेशनचे शेती संशोधन क्षेत्रात दमदार पाऊल : जगात सर्वप्रथम केली कॉफी, काळी मिरी टिश्यूकल्चर रोपांची  निर्मिती

जळगाव/प्रतिनिधी : शेतीत अमुलाग्र बदल घडवत शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहचवण्याचे काम सातत्याने जैन इरिगेशन उद्योग समूहाकडून सुरू आहे. शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून शाश्वत उत्पन्नाचा मार्ग जैन उद्योगाने निर्माण करून दिला आहे. केळी, डाळिंब, स्ट्रॉबेरी, बटाटा पिकांच्या टिश्यूकल्चर रोपे उत्पादनानंतर आता जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने प्रथमतःच कॉफी आणि काळी मिरी पिकांचे टिश्यूकल्चर पद्धतीने रोपे निर्मितीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामुळे कॉफी व काळी मिरी उत्पादकांना जनुकीयदृष्ट्या शुद्ध, एकसारखी व रोगमुक्त रोपांच्या उपलब्धतेमुळे उत्पन्न वाढीचा मार्ग गवसणार आहे.जैन इरिगेशन कंपनीच्या शास्त्रज्ञांनी कॉफी व काळी मिरी या दोघंही पिकांवर अनेक वर्षे संशोधन करून प्रयोगशाळेतील विविध प्रयोगाअंती या पिकांचे टिश्यूकल्चर रोप निर्मिती तंत्रज्ञान विकसित करण्यात यश प्राप्त केले आहे. कॉफी व काळी मिरी पिकातील टिश्यूकल्चर पद्धतीने रोपे निर्मितीचे हे पहिलेच संशोधन आहे. 

शेती, शेतकरी यांच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या जैन इरिगेशनने जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्राचे नाव पुन्हा जागतिक नकाशावर अधोरेखित केले आहे. नावीन्यपूर्ण संशोधनासाठी कटिबद्ध असलेल्या या उद्योगाने संशोधनाची परंपरा इतर पिकांवरील संशोधनात सुरू ठेवली असून लवकरच शेतकऱ्यांसाठी आणखी काही पिकांचे तंत्रज्ञान विकसित करून शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. 

या जाती केल्या विकसीत

जैन इरिगेशनच्या जैन हायटेक प्लांट फॅक्टरीमध्ये कॉफी पिकांची दोन प्रकारच्या प्रजाती विकसीत करण्यात आल्या आहेत. त्यात चंद्रगिरी व सी एक्सआर प्रजातींचा समावेश आहे. तर काळी मिरी या पिकात टिश्यूकल्चर पद्धतीने चार प्रजाती विकसीत केल्या आहेत. यामध्ये पन्नीयुर-१, पन्नीयुर-७, पन्नीयुर-८ आणि करीमुंडा यांचा समावेश आहे. कंपनीने टिश्यूकल्चर पद्धतीने निर्मित कॉफीच्या दोन व काळी मिरीच्या चार प्रजाती बाजारात उपलब्ध करण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलली आहेत. त्यासाठीच कॉफी व काळी मिरी उत्पादक व्यापारी संस्था, कॉफी व काळी मिरी उत्पादक शेतकरी संस्था आणि व्यक्तिगत कॉफी व काळी मिरी मालमत्ताधारकांसोबत कॉफी व काळी मिरी रोपे उत्पादन करुन त्यांना उपलब्ध करून देण्यासंबंधीत करार करण्यासाठी प्रस्ताव देखील कंपनीने मागवले आहेत. 

 विकसीत जातींची वैशिष्ट्ये 

*कॉफी व काळी मिरीची टिश्यूकल्चर रोपे ही रोगमुक्त व जनुकीयदृष्ट्या सर्वोत्तम मातृवृक्षांपासून तयार केलेली जातात. ही रोपे माती विरहित माध्यमात हरितगृहात हार्डनिंग केली जातात.

*रोपांची मुळे दाट, मजबूत आणि पुर्ण विकसित झालेली असतात त्यामुळे ही रोपे शेतात लगेच लागवडीसाठी तयार असतात.

*टिश्यू कल्चर निर्मित ही रोपे खास मुळसंरक्षक ट्रे मध्ये वाढवली जातात. यात दोन आकारातील ट्रे मध्ये रोपे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ह्या रोपांना लागवडीनंतर योग्य छाटणी केल्यावर झाडांचा उत्तम घेर तयार होतो.

*लागवडीनंतर रोपे जमिनीत लगेच स्थिरावतात व एकसारखी वाढतात. रोपे एकसारखी असल्यामुळे रोपांना एकाच वेळी फुले व फळे येतात. काटेकोर शेती व्यवस्थापन पद्धतीत (प्रिसिजन फार्मिंग) ही रोपे उत्तम प्रतिसाद देऊन भरघोस उत्पादन देतात.

पर्यावरणीय बदलांवर खास उपाय 

सूक्ष्म सिंचनाचा वापर, कृषीतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पोषक मूलद्रव्ये व्यवस्थापन आणि जल व्यवस्थापन वापरुन दोन्ही पिकांचे भरघोस उत्पादन व गुणवत्ता मिळवता येते. या पिकांसाठी स्मार्ट सिंचनाचे अनेक उपाय शेतकऱ्याला वापरता येतात. यामुळे वरील पिकांची उत्पादकता व गुणवत्ता वाढून पर्यावरणातील अचानक बदलांना सामोरे जाणे शक्य होते. 

'स्मार्ट अॅग्रीकल्चरसाठी टिश्यूकल्चर

गेल्या तीस वर्षांपासून जैन ग्रॅण्ड नैन केळीच्या टिश्यूकल्चर रोपांमुळे शेतकरी बांधवांना निर्यातक्षम केळी उत्पादन मिळत आहे. यातून शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होत आहे. यात आता जैन इरिगेशनच्या कॉफी व काळी मिरी या टिश्यूकल्चर रोपांचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध झाल्यामळे वातावरणातील बदलांवर मात करून उत्पादन वाढीबरोबरच गुणवत्ता वाढ साध्य करून निर्यातक्षम उत्पादन घेणे शक्य होणार आहे. कॉफी व काळी मिरी उत्पादकांनी आता जैन टिश्यूकल्चर तंत्रज्ञानाने निर्मित कॉफी व काळी मिरी रोपांच्या वापराबरोबरच स्मार्ट अॅग्रीकल्चर ही संकल्पना प्रत्यक्षात साकारावी.

--अजित जैन, सहव्यवस्थापकीय संचालक, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि., जळगाव