मयत महिलेच्या नावावरील विमा प्रकरणी कृषी विभागासह विमा कंपनीचे अधिकारी सतर्क : लाभ घेणाऱ्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता
सिंडिकेटची यादी तपासणीसाठी पोलिसांकडे
प्रतिनिधी/रावेर
15 वर्षांपूर्वी मयत असलेल्या महिलेच्या रावेर तालुक्यातील अभोडा शिवरातील 4 हेक्टर क्षेत्रावर केऱ्हाळ्याच्या व्यक्तीने खोटा करारनामा व स्वयं घोषणापत्र सादर करून 2 लाख 80 हजार रुपये केळी पीक विम्याची रक्कम लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे कृषी विभाग व विमा कंपनीचे अधिकारी खडबडून जागे झाले असून अधिक सतर्क झाले आहेत. या प्रकरणाची उद्यापासून वरिष्ठ पातळीवरून कसून चौकशी व तपासणी करण्यात येणार आहे. यात दोषी आढळणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची शक्यता कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील केळी पीक विमा घोटाळा मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. प्रत्यक्षात केळीची लागवड नसताना केळी लागवड असल्याचे दर्शवून केळी पीक विम्याचा लाभ घेतल्याचे प्रकार शासनाच्या पाहणीत निदर्शनास आले. 15 वर्षांपूर्वी मयत असलेल्या महिलेच्या आभोडा शिवरातील 4 हेक्टर क्षेत्रावर केऱ्हाळा येथील एकाने सदर महिलेच्या सहीची खोटी कागदपत्रे विमा कंपनीला सादर केली होती. शासनाची दिशाभूल व फसवणूक करीत या क्षेत्रावर सदर व्यक्तीने 2 लाख 80 हजार रुपयांची विमा रक्कम लाटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याची काल बातमी प्रकाशित होताच कृषी विभाग व विमा कंपनीचे अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. या दोन्ही विभागाचे अधिकारी या घटनेमुळे अधिक सतर्क झाले असून या प्रकरणाची उद्यापासून कसून चौकशी व तपासणी करण्यात येणार आहे. या व्यक्तीने यापूर्वीही दुसऱ्याच्या नावावर परस्पर लाभ घेतला आहे का? याचीही चौकशी यानिमित्ताने करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणात स्थानिक विमा प्रतिनिधीचा काही सहभाग आहे किंवा नाही, तसेच सिंडिकेटच्या (एजंटच्या) माध्यमातून या विम्याचा लाभ घेतला आहे का? याबाबत कसून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषी असलेल्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येतील असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आठवडाभरात सिंडिकेटची यादी मिळणार
पीक विमा योजना घोटाळ्यात विमा प्रतिनिधिंसह सिंडिकेटच्या सहभागाची शक्यता वर्तवली जात असून याबाबत कृषी विभागाने मागवलेल्या हरकतीत अनेक शेतकऱ्यांनी विमा प्रतिनिधिबाबत हरकत नोंदवली आहे. तसेच काही या घोटाळ्याची साखळी म्हणून कार्यरत असलेल्या काही एजंटची नावे दिली आहेत. ही यादी तपासणीसाठी पोलीस विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची विश्वासनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.

krushisewak 
