प्रेरणादायी : सीड्स बॉल प्लॅन्टेशनद्वारे सातपुड्यात वृक्ष लागवडीचा अनोखा प्रयोग : १० विविध जातींच्या २५ हजार सीड्स बॉलचे प्लॅन्टेशन

रावेर तालुका अग्रो डीलर असोसिएशनचा उपक्रम

प्रेरणादायी : सीड्स बॉल प्लॅन्टेशनद्वारे सातपुड्यात वृक्ष लागवडीचा अनोखा प्रयोग : १० विविध जातींच्या २५ हजार सीड्स बॉलचे प्लॅन्टेशन

प्रतिनिधी / रावेर

कृषिदिनाचे औचित्य साधून रावेर तालुका अग्रो डीलर असोसिएशनतर्फे सातपुडा पर्वतात सीड्स बॉल टाकून देत प्लॅन्टेशन करीत वृक्ष लागवडीचा अनोखा प्रयोग राबवला. जिल्हा कृषि अधीक्षक कुर्बान तडवी व माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ पाटील यांच्या हस्ते १० विविध जातींच्या २५ हजार सीड्स बॉलचे प्लॅन्टेशन यावेळी करण्यात आले. या उपक्रमाची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरु आहे.

सातपुड्यात वृक्ष लागवड व संवर्धनासाठी रावेर तालुका अग्रो डीलर असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. कृषिदिनानिमित्त सातपुड्यातील सुकी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या गारबर्डी गावाजवळ हा उपक्रम राबविण्यात आला. त्यानंतर पाल कृषि विज्ञान केंद्रात संघटनेतर्फे आयोजित कार्यक्रमात रावेर तालुक्याचे भूमिपुत्र व जिल्हा कृषि अधीक्षक कुर्बान तडवी यांचा संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ होते. हरित क्रांतीचे प्रणेते स्व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर पाल कृषि विज्ञान केंद्राचे संचालक धनंजय चौधरी, कृषि विकास अधिकारी सुरज जगताप, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख महेश महाजन, जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी विकास बोरसे, मोहीम अधिकारी विजय पवार, तालुका कृषि अधिकारी भाऊसाहेब वाळके, पंचायत समितीचे कृषि अधिकारी एल ए पाटील, रावेर तालुका अग्रो डीलर असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कोंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी संघटनेचे सचिव युवराज महाजन, चंद्रकांत अग्रवाल, राहुल पाटील, राजेंद्र महाजन, एकनाथ महाजन, प्रफुल्ल पाटील, पिंटू पवार, मुक्ताईनगरचे तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, यावलचे तालुकाध्यक्ष मिलिद वायकोळे यांच्यासह रावेर, यावल तालुक्यातील कृषि सेवा केंद्र चालक उपस्थित होते.         

संघटनेचे कार्य प्रेरणादायी : कुर्बान तडवी

रावेर तालुका अग्रो डीलर असोसिएशनचे पदाधिकारी केवळ कृषि केंद्रांच्या माध्यमातून व्यवसाय न करता सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. शेतकऱ्यांना सेवा पुरविण्याबरोबरच सातपुड्यात सीड्स बॉलचे प्लॅन्टेशन करून वृक्ष लागवडीची चळवळ उभी केळी आहे. संघटनेचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे असे मत जिल्हा कृषि अधिकारी कुर्बान तडवी यांनी व्यक्त केले.

 राज्यात उपक्रम राबवू : विनोद तराळ   

रावेर तालुका अग्रो डीलर संघटनेने राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून भविष्यातील ग्लोबल वार्मिंगच्या उद्भवणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे. वृक्ष लागवड व संवर्धन हाच यावर एकमेव पर्याय आहे. सातपुड्यात राबविलेला सीड्स बॉल प्लॅन्टेशनचा उपक्रम राज्यात राबविण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन माफदाचे अध्यक्ष विनोद तराळ पाटील यांनी दिले.

सामाजिक संस्थांनी पुढे यावे : सुनील कोंडे

पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने एक झाड लावावे. तसेच सामाजिक संस्था व संघटनांनी सातपुड्यात वृक्ष लागवड व संवार्धानासाठी पुढे यावे असे आवाहन रावेर तालुका अग्रो डीलर असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कोंडे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना केले.

असे बनवले सीड्स बॉल

सातपुड्यात नैसर्गिकरीत्या कमी पाण्यात तग धरणाऱ्या झाडांच्या बिया (सीड्स) काही ठिकाणावरून विकत घेतल्या. १० विविध झाडांच्या बिया जमा झाल्यावर शेणमाती घेवून त्यात या बिया टाकून एकत्र करण्यात आल्या. त्यानंतर या एकत्रित मिश्रणाचे लहान गोळे (बॉल) बनविण्यात आले. सुमारे २५ हजार बॉल तयार केले होते. यासाठी संघटनेचे पदधिकारी, कृषि सेवा विक्रेते, तालुकाध्यक्ष सुनील कोंडे यांच्या परिवाराचे सदस्य यांनी सहकार्य केले.