शेतकरी हितासाठी आमदार अमोल जावळे यांचा पुढाकार : केळीवरील फ्युजारीयम विल्ट रोगाच्या प्रतिबंधासाठी मंत्रालयात बैठक
रोगाच्या निर्मूलनासाठी मोहीम राबविण्याचा निर्णय
प्रतिनिधी/रावेर
जळगाव जिल्ह्याची अर्थव्यवस्था केळी पिकावर अवलंबून आहे. मात्र सध्या केळी पिकावर फ्युजारीयम विल्ट या घातक रोगाचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्याने हा केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय आहे. रावेर विधानसभा मतदार संघांचे आमदार यांनी या रोगावर तात्काळ प्रतिबंध करण्यासाठी शासकीय स्तरावरून हालचाली सुरु केल्या आहेत. श्री जावळे यांच्या पुढाकाराने राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या रोगाच्या प्रभावी व्यवस्थापन व निर्मूलनासाठी शास्त्रोक्त पद्धतीने विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
आमदार अमोल जावळे यांनी जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल आणि मुक्ताईनगर तालुक्यांमध्ये या रोगाचा वाढता प्रादुर्भाव कृषिमंत्री भरणे यांच्या निदर्शनास आणून दिला. आतापर्यंत सुमारे १२ गावांमध्ये रोग आढळला असून, काही शेतांमध्ये सुरुवातीची लक्षणे स्पष्ट न झाल्याने परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
फिलीपिन्स, चीन, तैवान, ऑस्ट्रेलिया आणि मलेशिया या देशांमध्ये फ्युजारीयम विल्टमुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा उल्लेख बैठकीत करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील केळी हे सुमारे ६००० कोटी रुपयांच्या वार्षिक उलाढालीचे प्रमुख नगदी पीक असून, जिल्ह्याच्या सुमारे २२ बिलियन अर्थव्यवस्थेत त्याचा मोठा वाटा आहे. जिल्ह्याच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीत केळी पिकाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील यांनी रोग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. यात रोगग्रस्त झाडे तात्काळ नष्ट करणे, बाधित क्षेत्र क्वारंटाईन करणे, बायो-सिक्युरिटी उपाययोजना राबविणे, फूट बाथ व टायर बाथ व्यवस्था उभारणे, जिल्हा व राज्याच्या सीमेवर बायो-सिक्युरिटी यंत्रणा कार्यान्वित करणे तसेच जैविक व रासायनिक नियंत्रण पद्धतींचा अवलंब करणे यांचा समावेश आहे.
तसेच त्रिची (तामिळनाडू ) येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून उपाययोजना राबविण्याबाबत चर्चा झाली. डॉ. अरुण भोसले यांनी केळी संशोधन केंद्र, जळगाव व राष्ट्रीय केळी संशोधन संस्था, त्रिची यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या प्रायोगिक संशोधनाची माहिती सादर केली.बैठकी दरम्यान कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्याशी संवाद साधून या विषयाचा सखोल अभ्यास करून तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी रोगाला प्रभावीपणे आळा घालण्यासाठी समन्वित आणि टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणाऱ्या उपाय योजनांचा आराखडा मांडला. रोग नियंत्रणासाठी तातडीने कृती आराखडा राबविण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. बैठकीस कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी, जळगावचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, डॉ. दाटकर, सहाय्यक संशोधन संचालक डॉ. विजय शेलार, डॉ. अरुण भोसले, शेलकांडे, शुभम पाटील, एमसीआरच्या वर्षा लढ्ढा व संबंधित तज्ज्ञ उपस्थित होते.

krushisewak 
