BREAKING : बॅनरवर पक्षश्रेष्ठींचे फोटो न टाकण्यासाठी रावेरला भाजपच्या मंडळ अध्यक्षांचा दबाव : सोशल मिडिया प्रमुखाचा सोशल मिडीयावर राजीनामा व्हायरल

रावेर तालुक्यात चर्चा होताच सोशल मिडीयावरून राजीनामा हटवला

BREAKING : बॅनरवर पक्षश्रेष्ठींचे फोटो न टाकण्यासाठी रावेरला भाजपच्या मंडळ अध्यक्षांचा दबाव : सोशल मिडिया प्रमुखाचा सोशल मिडीयावर राजीनामा व्हायरल

प्रतिनिधी/रावेर

पक्षातील श्रेष्ठींचे व जिल्ह्यावरील प्रमुख कार्यकर्त्यांचे इतर कोणतेही फोटो वापरू नको, बॅनरवर व पोस्ट तयार करतांना फक्त आमदारांचा फोटो वापर अशा वरिष्ठांच्या सूचना आहेत असा रावेरचे मंडळ अध्यक्ष रवींद्र पाटील सतत दबाव टाकत असल्याने याला कंटाळून सोशल मिडिया प्रमुख रामभाऊ प्रल्हाद शिंदे यांनी पदाचा राजीनामा शनिवारी रात्री सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. याची रात्रीपासून तालुक्यात चर्चा सुरु होती. दरम्यान घरचा आहेर भेटल्याने व पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दल नागरिकांमध्ये चर्चेला उधान आल्याने रविवारी दुपारी रामभाऊ शिंदे यांनी सोशल मिडीयावर टाकलेला राजीनामा हटवला आहे.

भाजपचे रावेर दक्षिण मंडळचे अध्यक्ष रवींद्र पाटील आहेत. तर सोशल मिडिया प्रमुख रामभाऊ प्रल्हाद शिंदे आहे. रामभाऊ शिंदे यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, मी एक वर्षापासून दक्षिण मंडळाचा सोशल मिडिया प्रमुख म्हणून प्रामाणिकपणे पक्षाच्या नियम व अटींच्या अधिक राहून काम करत आहे. परंतु मंडळ अध्यक्ष हे सतत माझ्यावर दबाव टाकून पक्षातील श्रेष्ठींचे व जिल्ह्यावरील प्रमुख कार्यकर्त्यांचे फोटो बॅनरवर व पोस्ट मध्ये टाकू नको यासाठी सतत दबाव आणून कटकट करीत असतात. वरिष्ठांनी सांगितले आहे की

फक्त बॅनरवर व पोस्ट तयार करतांना फक्त आमदारांचा फोटो वापर याव्यतिरिक्त बनरवर दुसरा कोणताही फोटो घ्यायचा नाही अशी दमदाटी केली जाते. जिल्ह्यात केंद्रीय राज्यमंत्री, वरिष्ठ मंत्री असल्याने त्यांचे फोटो मी घेत असतो. मात्र हे फोटोही घ्यायचे नाही अशी दमदाटी केली जाते असे रामभाऊ शिंदे यांनी राजीनाम्यात म्हटले आहे. तसेच पक्षात शिस्त राहिली नसून व्यक्ती केंद्रित पक्ष होत असल्याने संघटना खिळखिळी होत आहे. याकडे पक्षश्रेठींनी वेळीच लक्ष द्यावे. माझ्याप्रमाणे अनेकांची अशाच प्रकारे पिळवणूक होत आहे असे राजीनाम्यात म्हटलेले आहे. हा राजीनामा रावेर दक्षिण मंडळ अध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या नावाने देण्यात आला असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन, आमदार अमोल जावळे व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांना प्रत रवाना असा राजीनामा पत्राच्या शेवटी उल्लेख आहे.

आरोप बिनबुडाचे : रवींद्र पाटील

याबाबत भाजपचे रावेर दक्षिण मंडळ अध्यक्ष रवींद्र पाटील यांची प्रतिक्रिया घेतली असता रामभाऊ शिंदे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत एवढेच उत्तर त्यांनी देत अधिक बोलणे टाळले.

शिंदे यांच्या म्हणण्यात तथ्य

यापूर्वी भाजपने विविध कार्यक्रमानिमित्त प्रकाशित केलेल्या बनरवर अनेक वेळा रावेर तालुक्यातील जेष्ठ पक्ष श्रेष्ठी असलेल्या व्यक्तीचा फोटो वगळण्यात आलेला आहे. याबाबतचे वृत्तही त्यावेळी प्रकाशित करून पक्षाच्या निदर्शनास आणले होते. त्यामुळे रामभाऊ शिंदे यांच्या म्हणण्यात तथ्य असल्याचे दिसून येते.