रावेर तालुक्यातील गुटका तस्करीत ५० एजंटची टोळी कार्यरत : अधिवेशनात प्रश्न मांडणार : आ. एकनाथराव खडसे

तस्करीचा “अशपाक’ मास्टरमाइंड

रावेर तालुक्यातील गुटका तस्करीत ५० एजंटची टोळी कार्यरत : अधिवेशनात प्रश्न मांडणार : आ. एकनाथराव खडसे

प्रतिनिधी/रावेर

महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटक्याची बऱ्हाणपूर(मध्यप्रदेश) व वलसाड(गुजरात) येथून रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सर्रासपणे अवैधरीत्या वाहतूक व विक्री सुरु आहे. बऱ्हाणपूर येथून अवैधरीत्या हा गुटका जळगाव जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यात वाहतूक करणारी मोठी टोळी तालुक्यात कार्यरत आहे. रावेर तालुक्यात खुलेआमपणे होणाऱ्या गुटक्याची वाहतूक व विक्री प्रकरणाचा प्रश्न सध्या सुरु असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली.

बऱ्हाणपूर व वलसाड येथून दररोज मोठ्या प्रमाणावर रावेर तालुक्यात अवैधरीत्या गुटक्याची वाहतूक विक्री व साठवणूक केली जात आहे. येथून हा गुटका स्थानिक एजंटामार्फत मुक्ताईनगर, भुसावळ, यावल, फैजपूर, जामनेर चोपडा व जिल्ह्यात इतर तालुक्यात पोहचवला जातो. तसेच बुलडाणा व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुटक्याची तस्करी करणारी मोठी टोळी कार्यरत आहे. पानटपरीवर खुलेआमपणे गुटक्याच्या पुड्यांची विक्री होत असल्याचे दिसून येत आहेत. गुटका विक्री व वाहतुकीचे रॅकेट चालवणाऱ्या मनीष नामक गुटका माफियाकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. गुटक्याच्या तस्करीत दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असून नागरिकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आले आहे. या गंभीर प्रकारांची आपण दखल घेतली असून सध्या सुरु असलेल्या विधी मंडळाच्या अधिवेशनात याबाबतचा प्रश्न मांडण्यात येणार असल्याचे माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी सांगितले.  

तस्करीचा “अशपाक’ मास्टरमाइंड

रावेर तालुक्यातील ग्रामीण भागात गुटक्याची बिनबोभाटपणे वाहतूक करण्यासाठी सुमारे ५० एजंट कार्यरत आहेत. यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात पानटपरी चालकांपर्यंत सुरळीतपणे गुटका पोहचवला जातो. रावेर तालुक्यात अशपाक हा गुटका व्यवसायातील खरा मास्टरमाइंड असून मनीषच्या माध्यमातून गुटक्याची तस्करी केली जात आहे. मास्टर माइंड अशपाकला व गुटका माफिया मनीषला पोलीस शोधून काढणार का ? पुरावा नसताना गुन्ह्याची उकल करण्यात गुन्हे शोध पथक कर्तव्यतत्पर आहे. दमदार कामगिरी असलेल्या या पथकाच्या नजरेत मात्र खुलेआमपणे रावेरमार्गे होणारी गुटक्याची तस्करी येवू नये ही सर्वसामान्यांना न पटणारी बाब आहे. रावेर तालुक्यात अवैधरीत्या चालणाऱ्या गुटका तस्करीचा पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांनी पर्दाफाश व बिमोड करावा अशी नागरिकांची मागणी आहे.

 " गुटका वाहतूक व विक्री प्रकरणी पोलिसांची शहरासह परिसरात कायमस्वरूपी गस्त असून वाहतूक करतांना अथवा विक्री करतांना कोणी आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाते. महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे." 

---डॉ विशाल जयस्वाल, पोलीस निरीक्षक रावेर