पंचनाम्याचे आता सोपस्कार पुरे, मदत द्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी
पंचनाम्याचे आता सोपस्कार पुरे, मदत द्या
प्रतिनिधी /रावेर
रावेर तालुक्यात शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने १७ गावातील १४६० हेक्टरवरील केळीचे तर लोहारा व खिरोदा या दोन गावातील २१९ घरांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा आकडा सुमारे ७० कोटींच्या आसपास आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा हात देणे आवश्यक आहे. नेहमीप्रमाणे पंचनामे करण्याचा सोपस्कार पार पाडला जात आहे. मात्र या शेतकऱ्यांना मदत केव्हा मिळणार याबाबत खुद्द शेतकरीच अनभिज्ञ आहेत. पंचनाम्याचे सोपस्कार आता पुरे, मदत द्या अशी विनंती शासनाकडे शेतकरी करीत आहेत. नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषि विभागातर्फे सुरू करण्यात आले आहेत. खासदार रक्षा खडसे, आमदार शिरीष चौधरी, तहसिलदार बंडू कापसे यांनी नुकसानग्रस्त भागाला भेट देवून पाहणी करीत फोटोसेशन केले. मात्र या लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडून शासन दरबारी हा विषय मांडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा .
शनिवारी अवकाळी पावसाने तालुक्याला झोडपले. यात तालुक्याच्या उत्तरेकडील गावांना मोठा फटका बसला आहे. रायपुर, सुदगाव, रसलपुर, कुंभारखेडा , सावखेडा खुर्द, सावखेडा बुद्रुक, रोझोदा, कोचुर बुद्रुक, कोचूर खुर्द, बोरखेडा सीम, गौरखेडा, चिंचाटी, जानोरी, कळमोदा, चिनावल, लोहारा , खिरोदा प्र यावल या १७ गावांना वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. या गावातील ८९६ शेतकऱ्यांचे १४६० हेक्टर क्षेत्रावर केळी बागांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान लोहारा शिवारात झाले असून येथील २८० शेतकऱ्यांचे ४५० हेक्टर क्षेत्रावरील केळी बागांचे नुकसान झाले आहे.
गावनिहाय नुकसानीची हेक्टरमध्ये आकडेवारी (कंसात शेतकरी संख्या)
रायपुर (२६)-१४ हेक्टर , सुदगाव(१८)-११, रसलपुर (१)- ०.७०, कुंभारखेडा (८)-१० , सावखेडा खुर्द (६२)-१२५, सावखेडा बुद्रुक (१४०)२६२, रोझोदा (७०)-११२, कोचुर बुद्रुक-(१५)-१०, कोचूर खुर्द(१४)-१०, बोरखेडा सीम (८)-५ , गौरखेडा(१८)-१६, चिंचाटी (१६)-४०, जानोरी (८)-४०, कळमोदा (२०)-३५, चिनावल (१२)-२०, लोहारा (२८०)-४५०, खिरोदा प्र यावल (१८०)- ३०० हेक्टर.
70 कोटींच्या नुकसानीचा अंदाज
या अवकाळी पावसामुळे केळी बागांचे व घरांचे एकूण ६६ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तहसिलदार बंडू कापसे यांनी व्यक्त केला आहे. लोहारा येथील ११९ तर खिरोदा येथील सुमारे १०० घरांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे अनेक घरांवरील पत्रे उडाली असून ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले होते.
नुकसानग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी प्रयत्न : शिरीष चौधरी
अवकाळी पावसाने तालुक्यातील केळी बागा तसेच घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून अहवाल वरिष्ठांना पाठविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. शासन दरबारी हा प्रश्न मांडून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती आमदार शिरीष चौधरी यांनी दिली.