SUCCESS STORY : नोकरीला रामराम ठोकत हायटेक शेती करणारा युवा शेतकरी : चोरवडच्या मल्हार कुंभार यांनी दिली शेतीला पूरक उद्योगाची जोड
कृषि शिक्षणाचा उपयोग समाजाच्या विकासासठी
कृष्णा पाटील
कृषी अभ्यासक्रमातील पदवी शिक्षण घेतलेल्या पारोळा तालुक्यातील चोरवड (जि जळगाव) येथील युवा शेतकरी मल्हार प्रल्हाद कुंभार यांनी शेतीला पूरक उद्योगांची जोड देत शेती व्यवसाय नफ्यात आणला आहे. विविध पिकांची लागवड करताना नियोजन, व्यवस्थापन व विक्री यावर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. शेतात उत्पादित केलेल्या मालाची विक्री करण्यासाठी त्यांनी शेतकरी ते ग्राहक या योजनेचा आधार घेतला आहे. संपूर्ण क्षेत्र सिंचनाखाली असून त्यासाठी ठिबक व तुषार सिंचनाचा मल्हार वापर करतात.
मल्हार कुंभार यांच्याकडे ४ हेक्टर ५४ आर एवढी शेती आहे. त्यात कापूस, उडीद, मूग, गहू, हरबरा, काकडी, मिरची, ज्वारी या पिकांचे ते उत्पादन घेतात. गेल्या दहा वर्षापसून ते शेती व्यवसाय करीत आहेत. त्याला पूरक उद्योग म्हणून कुकुट्टपालन, मत्स्यपालन, शेळी पालन, दूध व्यवसायाची जोड दिली आहे. त्यामुळे त्यांनी शेतीसोबत उत्पन्नाचे इतर मार्ग निर्माण केल्याने त्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. फळबाग लागवड योजनेतही त्यांचा सहभाग असून एक हेक्टरवर पेरू तर ५० आर क्षेत्रावर लिंबूची लागवड केलेली आहे.सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधून चर्चा करतात. गेल्या दहा वर्षांपासून पोल्ट्री व्यवसाय त्यांचा सुरु आहे.
शेती हा व्यवसाय बिना भरवशाचा व निसर्गावर अवलंबून असल्याचा आजपर्यंतचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. चोरवड ता पारोळा (जि जळगाव) येथील कृषि पदवीचे शिक्षण असलेले मल्हार कुंभार एका खाजगी कंपनीत नोकरीला होते. परंतु शेतीची आवड असल्याने नोकरीत फारसे मन रमले नाही. नोकरी सोडून देत घरच्या शेतीत कार्य करण्याचे ठरवले. परंतु कुटुंबियांनी व मित्रमंडळीनी याला प्रथम विरोध केला. परंतू मनाचा निर्णय ठाम असल्याने सर्वांचा विरोध झुगारून शेती करण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्षात शेतीमध्ये काम सुरू केले. सुरुवातीला बहुतांश अडचणी आल्या. सिंचनाची सुविधा नसल्याने केवळ पिक निसर्गावर अवलंबून असलेली खरीप हंगामाची पिक पद्धती होती.
शेततळे उभारून सिंचनाची सुविधा
पूरक व्यवसायाची जोड
संरक्षित शेतीवर भर
निर्सगाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास अनेकवेळा नैसर्गिक आपत्तीमध्ये हिरावून घेतला जातो. यासाठी सर्कशीत शेती करण्याला प्राधान्य दिले आहे. पारंपरिक पीकपद्धती सोबतच संरक्षित शेतीचा उपयोग करून मल्हार कुंभार यांनी दोन एकर क्षेत्रावर शेडनेट हाऊसची उभारणी केलेली असून यामध्ये काकडी, शिमला मिरची, टोमॅटो यासारखी पिकांचे वर्षभर उत्पादन घेतले जाते. शेतकरी गटाची नोंदणी करून (ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चालीत ५ अवजारे) चा समावेश असलेली अवजार बँकेची खरेदी केलेली आहे. अवजार बँकेवरील प्रकल्प खर्च हा १४ लाख रुपये होता. त्यापोटी आमच्या गटास ७ लाख २३ हजार अनुदान मिळाले आहे. तसेच गटाच्या माध्यमातून ६० टक्के अनुदानावर गोडाऊन बांधणी केलेली आहे.
प्रशिक्षण मेळाव्यातून
शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान समजून घेण्यासठी मल्हार कुंभार हे विविध ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या शेती विषयक प्रशिक्षण, कृषि मेळावे, कृषि प्रदर्शनांना भेटी देतात. याशिवाय कृषि दैनिके, साप्ताहिके, मासिके ते आवर्जून वाचतात. साप्ताहिक कृषिसेवकचा त्यांना शेती करताना लाभ होतो. कृषि क्षेत्रातील यशस्वी कार्याबद्दल त्यांचा अनेक संस्थांनी पुरस्कार देवून गौरव केला आहे.
" शेतीचे तंत्रज्ञान समजून घेत शेतकऱ्यांनी शेती केल्यास शेतीतून नफा मिळवता येतो. शेतीला पूरक व्यवसायाची जोड व योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. शेतीला व्यावसायिक दृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी पाहिल्यास नक्कीच यश मिळवता येते."
---- मल्हार प्रल्हाद कुंभार, युवा शेतकरी, चोरवड ता पारोळा जि जळगाव मो. ९७७८७५७५७५