रावेर मतदार संघात अखेर काँग्रेसला बंडखोरीचे ग्रहण : राजकीय वारसदारांना संधी की मतदार निवडणार तिसरा पर्याय ?
काँग्रेसच्या बंडखोर उमेदवाराचा कितपत राहणार प्रभाव ?
प्रतिनिधी / रावेर
विधानसभा निवडणुकीसाठी माघारीची मुदत 4 नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता संपली. 14 उमेदवारांनी माघार घेतल्याने एकूण 9 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. यात महायुतीतर्फे भाजपचे अमोल जावळे, महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे धनंजय चौधरी, प्रहार पक्षातर्फे अनिल चौधरी व माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद हे अपक्ष उमेदवार असून यांच्यामध्ये चौरंगी लढत होण्याची अधिक शक्यता आहे. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष असलेले दारा मोहम्मद यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना पक्षाने उमेदवारी न दिल्याने अखेर त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. दारा मोहम्मद यांनी काँग्रेसला एक प्रकारे आव्हान दिले असून काँग्रेसला बंडखोरीचे ग्रहण मात्र यनिमित्ताने लागले आहे. मतदार या निवडणुकीत कोणाला आशीर्वाद देतात हे मात्र 23 नोव्हेंबरला निकालातून दिसणार आहे.
रावेर मतदार संघातील लढतीचे चित्र माघारीनंतर स्पष्ट झाले. महायुतीचे उमेदवार अमोल जावळे, महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय चौधरी, प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अनिल चौधरी, अपक्ष उमेदवार दारा मोहम्मद, वंचित आघाडीच्या उमेदवार शमीभा पाटील यांच्यासह एकूण 9 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र खरी लढत महायुतीचे अमोल जावळे, महाविकास आघाडीचे धनंजय चौधरी, व प्रहार जनशक्तीचे अनिल चौधरी यांच्यात होण्याची अधिक चिन्हे आहेत. काँग्रेसचे बंडखोर व अपक्ष उमेदवार दारा मोहम्मद लढत देण्यात कितपत यशस्वी होतात हे निवडणुकीत दिसून येईल. मात्र ते किती मते घेतात यावर महाविकास आघाडी व महायुती तसेच प्रहारचे उमेदवाराच्या विजयाची गणिते अवलंबून आहेत. अल्पसंख्यांक समाजाचे मतदार 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून मतदान करतील असे काही जणांचे म्हणणे आहे. मात्र अपक्ष उमेदवाराला मिळणाऱ्या मतांमुळे महाविकास आघाडीच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसने धनंजय चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी या घराण्यातून लोकसेवक मधुकरराव चौधरी, त्यानंतर विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांनी मतदार संघांचे विधानसभेत लोकप्रतिनिधित्व केले आहे. आता यावेळी चौधरी घराण्यातील तिसरी पिढी धनंजय चौधरीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करीत आहे. भाजपचे माजी खासदार तथा आमदार स्व हरिभाऊ जावळे यांनी लोकसभेत व विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. अमोल जावळे यांच्या माध्यमातून जावळे परिवारातील दुसरी पिढी राजकारणात उतरत आहे. याशिवाय अनिल चौधरी व दारा मोहम्मद यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे.
नाराजीचा फटका नेमका कोणाला बसणार
या मतदार संघांचे प्रतिनिधित्व एकदोन वेळेचा अपवाद वागळता लेवा समाजाकडे राहिलेले आहे. एकदा हरिभाऊ जावळे तर दुसऱ्यांदा शिरीष चौधरी यांना मतदारांनी संधी दिलेली आहे. कोरोना काळात हरिभाऊ जावळे यांचे निधन झाले. तर प्रकृतीच्या कारणामुळे विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे पारंपरिक प्रतिस्पर्धी या निवडणुकीत आमनेसामने नसले तरी या दोघांचे राजकीय वारसदार असलेले सुपुत्र समोरासमोर लढत देत आहेत. दोघे उमेदवार नवखे असून या दोघांपैकी जनता कोणाला लोकप्रतिनिधी म्हणून संधी देते हे निकालानंतर दिसून येईल. तसेच दोन्ही प्रतिस्पर्धी राजकारणी घराण्यांना संधी देण्यापेक्षा मतदार तिसरा पर्याय निवडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतदारांमध्ये मोठया प्रमाणावरविविध कारणांवरून नाराजीचा सूर आहे. या नाराजीचा फटका कोणाला बसेल तर याचा लाभ कोणाला मिळेल हे आता सांगणे कठीण आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीतर्फे शक्ती प्रदर्शन करण्यात आले. याचे मतांमध्ये किती प्रमाणात रूपांतर होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बंडखोरीमुळे काँग्रेसला ग्रहण
काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांनी पक्षाचे सर्व आदेश झुगारून अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. यामुळे काँग्रेस रावेर मतदार संघात ग्रहण लावले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मात्र या निवडणुकीत त्यांचा कितपत प्रभाव राहतो हे त्यांना मिळणाऱ्या मतांवरून दिसेल.