जैन इरिगेशनचे हायटेक शेतीचे तंत्र शेतकऱ्यांना समर्पित : श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या जयंतीनिमित्त शेतीचा नवा हुंकार संकल्पनेचा शुभारंभ

महिनाभर चालणार कृषी महोत्सव : केळीची ३० फूट उंचीची बाग लक्षवेधी

जैन इरिगेशनचे हायटेक शेतीचे तंत्र शेतकऱ्यांना समर्पित : श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या जयंतीनिमित्त शेतीचा नवा हुंकार संकल्पनेचा शुभारंभ
हायटेक शेतीचा नवा हुंकार’ कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी अशोक जैन, डॉ. एच.पी. सिंग, अनिल जैन, अजित जैन, अतुल जैन, प्रवीण जैन, अभंग जैन, सुरेश जैन व बीड येथील शेतकरी.

कृषीसेवक न्यूज नेटवर्क / जळगाव  

जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन (मोठे भाऊ) यांचा १२ डिसेंबर हा जन्मदिवस. हा दिवस ‘संजीवन दिन’ म्हणून विविध कार्यक्रमांनी साजरा होतो. त्यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त ‘हायटेक शेतीचे तंत्र' जैन उद्योग समूहाने शेतकऱ्यांना समर्पित केले आहे. बदलत्या शेतीचा अचूक वेध घेत या उद्योगाने आधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानाचे दालन हायटेक शेतीचा नवा हुंकार या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी खुले केले आहे.  

या कृषी महोत्सवाचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी फलोत्पादन आयुक्त व महासंचालक तथा पुसा युनिर्व्हसिटीचे माजी कुलगुरू डॉ. एच.पी. सिंग, व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, गिमी फरहाद, कृषितीर्थचे संपादक डॉ. सुधीर भोंगळे व कृषि महोत्सवासाठी आलेले अंकुश गोरे यांच्यासह चौसाळा जि. बीड येथील १० शेतकरी, कंपनीचे सहकारी उपस्थित होते. हा कृषी महोत्सव १० डिसेंबर ते १४ जानेवारी २०२४ दरम्यान साजरा होत आहे.

महोत्सवाची मुख्य संकल्पना केळी

या वर्षाची कृषी महोत्सवाची मुख्य संकल्पना केळी असून केळीच्या विविध जाती, इलाक्की, पुवन, नेंद्रण, लाल केळी, बंथल व ग्रॅण्ड नैन, या केळीचे अतिशय देखणे प्लॉट उभे आहेत. केळी पिकातील आधुनिक तंत्रज्ञान, गादी वाफा, ड्रीप, फर्टिगेशन, एकाच बाजुने घड आणण्याचे तंत्रज्ञान, वातावरण बदलावर मात, नेट हाऊसमधील केळी, फ्रुट केअर, ३० फूट उंच केळी बाग असे सर्व व्यवस्थापन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षीक प्लॉट उभे आहेत.  

स्मार्ट इरिगेशन आकर्षण

शेतीचे नवतंत्रज्ञान शेतकऱ्यांना जवळून बघता यावे, कंपनीच्या तंत्रज्ञ, शास्त्रज्ञांशी सुसंवाद साधता यावे या दृष्टीने हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. गत वर्षी या उपक्रमास शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी ऊसाची आधुनिक पद्धतीने केलेली लागवड. सीओ-८६०३२ ऊसाच्या या लागवडीस केवळ ८ महिने २० दिवस झाले आहेत परंतु आज तो अडीच ते तीन किलो वजनाचा आहे व २६ ते ३० कांडे आहेत. त्याचे एकरी अंदाजे १२१ मेट्रीक टन उत्पादन मिळू शकते. फ्लॅटबेड, राईसबेड आणि मल्चिंगचा उपयोग केलेल्या कापूस लागवड पद्धतीचा प्रयोग, ८ वेगवेगळ्या व्हरायटीचे लसूण, कांदा लागवड, अल्ट्राहायडेन्सीटीच्या फळबागा, पपई, केळी, डाळिंब, चिकू, जैन स्वीट ऑरेंज, रब्बीतले सोयाबीन, शून्य मशागत तंत्रज्ञान, हळदीच्या विविध २० प्रकारच्या जाती, आंतरपीक म्हणून लावलेले आले, फळबागा, केळीच्या सहा वेगवेगळ्या व्हरायटी, ऑटोमेशन, स्मार्ट इरिगेशन, शेतीत वापरली जाणारी यंत्रसामुग्री, विविध अजारे इत्यादी शेतकऱ्यांसाठी मुख्य आकार्षण आहे. करार शेती अंतर्गत कांदा, टोमॅटो आणि हळद पिकाची केलेली लागवड शेतकऱ्यांना बघता येईल.      

महोत्सवात सहभागासाठी ऑनलाईन नोंदणी

जैन हिल्स परिसरात भारतभरातून येणाऱ्या असंख्य शेतकऱ्यांना शेतीच्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे. येथे करण्यात येणारे संशोधन, प्रयोग, शेती समोरील नवीन नवीन विषय, आव्हाने त्याबाबत शेतकऱ्यांनी कसा सामना करावा याबाबत योजना, ते सर्व शेतकऱ्यांना जैन हिल्स येथे बघायला मिळेल. या महोत्सवासाठी ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था करण्यात आलेली आहे शिवाय थेट जैन हिल्स येथे येऊन शेतकरी या महोत्सवात आपली नोंदणी करून सहभागी होऊ शकतात. या महोत्सवास शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.