रावेरला एकाच रात्रीत ७ ठिकाणी चोऱ्या : तहसीलदारांचे बंद घर फोडले, मापड्यानेच राशन दुकानात केली चोरी
पोलिसांसमोर चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान
प्रतिनिधी / रावेरर
रविवारी रात्री रावेर शहरात तब्बल सात ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. शहरातील जुना सावदा रोड, जीआय कॉलनी व रेल्वे स्टेशनजवळ या चोऱ्या झाल्या आहेत. येथील तहसीलदार बी ए कापसे यांच्या जुना सावदा रोडवरील बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झाला. स्टेशनवरील एका राशन दुकानातून नागरिकांना वाटपासाठी आणलेल्या गहू व तांदुळाचे कट्टे दुकानात काम करणाऱ्या मापड्यानेच चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जीआय कॉलनीत झालेल्या चोरीत मोठा ऐवज गेल्याची माहिती आहे. ठसेतज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. डीवायएसपी अन्नपूर्णा सिंग, एपीआय आशिषकुमार अडसूळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शहरात एकाच रात्री चोरीच्या सात घटना घडल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रविवारी रात्री शहरातील वीज पुरवठा खंडित झाला होता. ही संधी साधून जुना सावदा रोडवरील व जीआय कॉलनी परिसरात प्रत्येकी तीन ठिकाणी तर रेल्वे स्टेशनजवळ एका ठिकाणी अशा सात ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. येथील तहसीलदार बी ए कापसे हे जुना सावदा रोडवरील माऊली नगरात राहतात. सलग तीन दिवस सुट्या असल्याने घराला कुलूप लावून श्री कापसे बाहेर गावी गेले होते.हि संधी साधून चोरटयांनी रविवारी रात्री त्यांचे घर फोडले. मात्र येथे चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. सकाळी शेजाऱ्यांना घर उघडे असल्याचे लक्षात आल्यावर चोरीचा प्रकार उघडकीस आला. तर याच परिसरात आणखी दोन घटना घडल्या आहेत. जीआय कॉलनीत तीन चोरीच्या घटना घडल्या. यात एका ठिकाणी मोठा ऐवज गेल्याचे समजते. मात्र पोलिसात अद्याप याबाबत गुन्हा दाखल नाही. येथील स्टेशनवरील भागात असलेले राशन दुकान फोडून ५ गव्हाचे तर ६ तांदळाचे कट्टे असा एकूण १२,२०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. पोलिसांनी या घटनेत संशयित म्हणून दोघांना ताब्यात घेतले आहे. यापैकी एक जण याच दुकानात काम करणारा असल्याचे समजते.
रात्री गस्तीची मागणी
३० नोव्हेंबरला येथील पोलीस निरीक्षक कैलास नागरे सेवानिवृत्त झाल्यापासून येथील पोलीस निरीक्षक हे पद रिक्त आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ यांच्याकडे या पदाचा तात्पुरता पदभार देण्यात आलेला आहे. रावेर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणावर अवैध गावठी व देशी, विदेशी दारूची विक्री सर्रास सुरु आहे. तसेच चोरवडजवळ जुगाराचा अड्डा सुरु असल्याचे समजते. याशिवाय बऱ्हाणपूर मार्गाने तालुक्यात अवैध शस्त्र, गुटखा येण्याच्या घटनांना पोलिसांनी आळा बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. एकाच रात्रीत सात ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने चोरट्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान एपीआय आशिषकुमार अडसूळ यांच्यासमोर आहे.