रावेरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीमध्ये तुंबळ हाणामारी : खात्यात जमा झालेले पैसे काढण्याच्यावेळी घडला प्रकार
पहाटे चारवाजेपासून बँकेसमोर महिलांच्या रांगा
प्रतिनिधी/ रावेर
राज्यातील महिलांना दरमहा १५०० रुपये अर्थसहाय्य देणारी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राज्य सरकारने सुरु केली आहे. या योजनेंतर्गत जुलै व आगष्ट या दोन महिन्याचे असे एकूण तीन हजार रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यावर रक्षाबंधनाच्या दिवशी वर्ग करण्यात आले आहे. हि रक्कम काढण्यासाठी या लाडक्या बहिणींची पहाटे चार वाजेपासून बँकासमोर मोठी गर्दी होत आहे. रावेरमध्ये एका बँकेसमोर पैसे काढण्यासाठी लाडक्या बहिणींनी लावलेल्या रांगेत तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. या घटनेची संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरु आहे.
राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहे. नाव नोंदणी केलेल्या महिलांच्या खात्यावर रक्षाबंधनाचे औचित्य साधून दोन महिन्याचे ३००० रुपये टाकण्यात आले आहे. हि रक्कम काढण्यासाठी शहरातील विविध बँकांमध्ये महिलांची गेल्या दोन दिवसापासून मोठी गर्दी होत आहे. पहाटे चार वाजेपासून लाडक्या बहिणी रांगा लावत आहेत. येथील एका बँकेसमोर पैसे काढण्यासाठी लागलेल्या रांगेत दोन महिलांमध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला. हा वाद वाढत जाऊन मुख्यमंत्र्यांच्या या दोन्ही लाडक्या बहिणी हातघाईवर आल्या व काही वेळाने त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. अखेर बँकेच्या कर्मचार्यांनी हस्तक्षेप करीत या लाडक्या बहिणीमधील वाद मिटवला. मात्र संपूर्ण तालुक्यात या घडलेल्या प्रकारची एकाच चर्चा सुरु होती.