पोलिसांच्या गस्ती पथकाकडून रावेरला पावणे तीन लाखाची रक्कम जप्त : नाकाबंदी दरम्यान कारवाई
जप्त रक्कम जिल्हा कोषागारात जमा
प्रतिनिधी / रावेर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या गस्ती पथकाकडून नाकाबंदी सुरु असतांना दोघांकडून पावणे तीन लाख रुपयांची रक्कम मिळून आली आहे. ही रक्कम पोलिसांनी जप्त केली असून निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे यांनी जिल्हा कोषागारात जमा केली आहे.
पोलिसांचे गस्ती पथक येथील डॉ आंबेडकर चौकात नाकाबंदी करीत असतांना एक व्यक्ती काळी बॅग घेऊन जात असून त्यात पैसे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.सदर व्यक्तीस पोलिसांनी थांबवून चौकशी केली असता सुनिल लाखीचंद लुल्ल रा आदर्श नगर भुसावळ यांच्याकडे असलेल्या बॅगेत 85230 रुपये आढळून आले. तसेच राहुल सुनिल खटवानी रा रावेर याच्याकडे 1लाख 90 हजार 700 रुपये आढळून आले. या दोघांकडून एकूण 2 लाख 75 हजार 930 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. सदर रक्कमेचा पुरावा मागितला असता त्यांना देता आला नाही.ही रक्कम जिल्हा कोषागारात जमा करण्यात आली आहे.