बैलांसह गाडी विहिरीत पडल्याने दोन्ही बैलांचा मृत्यू : सुदैवाने शेतकरी बचावला
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यावर कोसळला दुःखाचा डोंगर
प्रतिनिधी / पाचोरा
सध्या कापूस वेचणीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. वेचलेल्या कापसाचे गाठोडे घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांकडून बैलगाडीचा वापर केला जातो. गाडीला बैल जुपून कापसाचे गाठोडे घेण्यासाठी शेतकरी गाठोड्याच्या दिशेने फिरताच बैलासह गाडी विहिरीत कोसळली. या घटनेत दोन्ही बैल जागीच ठार झाले आहेत. सुदैवाने शेतकरी बचावला असला तरी दिवाळीपूर्वीच त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
बांबरुड राणिचे ता पाचोरा येथील शेतकरी दगा ओंकार डांबरे यांच्या शेतात कापूस वेचणीचे काम गुरुवारी सुरु होते. वेचणी केलेल्या कापसाचे गाठोडे घरी आणण्यासाठी या शेतकऱ्याने विहिरीजवळ शेतात उभी असलेली बैलगाडी जुम्पली. व गाठोडे घेण्यासाठी माघारी फिरला. मात्र जुम्पलेल्या बैलगाडीच्या एका बैलांचा पाय शेजारील विहिरीत घसरल्याने बैलगाडी विहिरीत पडली. यात दोन्ही बैल जागीच ठार झाले. मात्र शेतकरी या घटनेत सुदैवाने बचावला आहे. सर्वसाधारण कुटुंबातील कष्टाळू शेतकरी दगा ओंकार डांबरे आहेत. या घटनेची माहिती कळताच शेताजवळील शेतकरी व गावातील सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. विहितील बैलगाडी शेतकऱ्यांच्या मदतीने ट्रॅक्टर व जेसीबीच्या साह्यानेवर काढण्यात आली. तलाठी पल्लवी वाघ यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.पशु वैद्यकीय अधिकारी यांनी मृत बैलांचे पीएम केले.
सदर शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली आहे. यावेळी घटनास्थळी राजु गंव्हाडे, पिंटु बांड, पिनु मोरे, छोटु बडगुजर, बंडु , भगवान डांबरे, विद्धेश्वर डांबरे, समाधान डांबरे,व इतर शेतकऱ्यांनी सहकार्य केले.