चर्चेतील विवाह : वधुपित्याची वऱ्हाडींना अनोख्या आहेराची मागणी
विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा
प्रतिनिधी / रावेर
सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. मोठ्या प्रमाणावर दररोज कुठे ना कुठे विवाह सोहळे पार पडत आहेत. मात्र काही विवाह सोहळे विविध कारणांमुळे चर्चेचा विषय बनतात. असाच रावेर लोकसभा मतदार संघातील एक विवाह सोहळा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. स्वतःच्या मुलीच्या विवाहप्रसंगी उपस्थित राहिलेल्या सर्व वऱ्हाडी मंडळींना वधुपित्याने "या" अनोख्या अहेराची भेट मागितली आहे. त्यामुळे सर्वत्र या विवाहाची चर्चा सुरु आहे.
ऐन लग्नसराईच्या काळात लोकसभेच्या निवडणूक होत आहेत. सूर्य आग ओकत असतांना निवडणुकीच्या रणधुमाळीने तप्त वातावरणात भर पडली आहे. रावेर लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनेही चांगलाच वेग घेतला आहे. रावेर लोकसभा मतदार संघात प्रस्थापित विरुद्ध सामान्य कुटुंबातील व्यक्ती असा लढा होत आहे. या मतदार संघात एका खेडेगावात गेल्या चार दिवसापूर्वी झालेला विवाह चर्चेचा विषय बनला आहे. लग्नघटिका जवळ आली होती. वधुवर बोहल्यावर चढलेले होते. वरवधू पक्षाकडील वऱ्हाडी मंडळी लग्न मंडपात उपस्थित राहून अक्षता टाकण्याच्या तयारीत होती. मंगलाष्टके सुरु होण्याची वऱ्हाडी वाट पाहत होते. तेव्हढ्यात वधूपित्याने स्टेजजवळ पोहचत माईक हातात घेतला. सर्वाना वाटले काही तरी सूचना करत असतील. मात्र वधुपित्याने विवाहासाठी उपस्थित असलेल्या वऱ्हाडींना एक आवाहन केले. माझ्या मुलीच्या लग्नात उपस्थित असलेल्या सर्वांना विनंती करतो कि, तुम्ही लग्नात आहेर नाही दिला तरी चालेल मात्र माझी कळकळीची विनंती आहे कि, यावेळी बदल करावा. हाच माझ्यासाठी सर्वात मोठा आहेर असेल.मात्र कोणता व काय बदल करावा हे मात्र वधू पित्याने सांगितले नाही. अखेर वऱ्हाडींना काय समजायचे ते समजले. राजकारणाशी अथवा निवडणुकीत उमेदवारी केलेल्या उमेदवारांशी त्यांचा काहीही नातेसंबंध नाही. या विवाहाला कोणीही राजकारणी , राजकीय पदाधिकारी उपस्थित राहिलेला नव्हता. तिळमात्र संबंध नसलेल्या एका सर्वसामान्य वधूपिता शेतकऱ्याचे हे बोल ऐकून उपस्थतांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. जमलेल्यामध्ये या बाबीचे चर्चेला उधाण आले. या वधूपित्याने कोणत्याही उमेदवारांचे नाव न घेता केलेले विनंती वजा आवाहन ऐकून वऱ्हाडी मंडळीही आवक झाली. त्यानंतर मंगलाष्टके सुरु झाली व विवाह सोहळा पार पडला. मात्र सर्वसामान्य माणसाच्या मनातील बोल वधुपित्याने बोलल्याची चर्चा वऱ्हाडींमध्ये सुरु होती.