दणका : रावेरचे गट शिक्षणाधिकारी शिंदे अखेर दोन्ही पदावरून पायउतार : सक्तीच्या वसुलीचे प्रकरण भोवले : रवींद्र बखाल यांच्याकडे दोन्ही पदांचा पदभार

शिंदेची विकेट आता वसुलीबाज केंद्रप्रमुख रडारवर

दणका : रावेरचे गट शिक्षणाधिकारी शिंदे अखेर दोन्ही पदावरून पायउतार : सक्तीच्या वसुलीचे प्रकरण भोवले : रवींद्र बखाल यांच्याकडे दोन्ही पदांचा पदभार
शिंदे यांच्याकडील पदभार काढण्याचा आदेश

प्रतिनिधी / रावेर 

शाळा तपासणीच्या नावाखाली शिक्षकांकडून केली जाणारी सक्तीची वसुली व आरटीई अंतर्गत पडताळणी समिती गठीत न केल्याचा प्रकार कृषिसेवक न्यूज नेटवर्कने उघडकीस आणत याचा भांडाफोड केला होता. याची दखल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी घेत गटशिक्षणाधिकारी साहेबराव शिंदे यांच्याकडील गटशिक्षणाधिकारी पदासह शालेय पोषण आहार अधीक्षक पदाचा असे दोन्ही पदांचे पदभार काढले आहेत. तर या दोन्ही पदांचे पदभार रवींद्र बखाल यांच्याकडे सोपविण्यात आल्याचा आदेश 30 एप्रिल रोजी काढला आहे. 

शाळा तपासणीच्या नावाखाली शिक्षकांकडून सक्तीची आर्थिक वसुली केली जात असल्याच्या गटशिक्षणाधिकारी शिंदे यांच्याबाबत शिक्षकांच्या तक्रारी होत्या. त्याचप्रमाणे प्रशासकीय अकार्यक्षमता, नियोजनशून्य कारभार व कार्यालयात अनुपस्थित राहणे याबाबत गटविकास अधिकारी यांनी गेल्या आठवड्यात शिंदे यांना शोकॉज नोटीस बजावली होती. दरम्यान, आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी पडताळणी समिती गठीत करण्याचे शासनाचे आदेश असतांना शिंदे यांनी हा आदेश धुडकावत मर्जीप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबविल्याचा प्रकार कृषिसेवक न्यूज नेटवर्कने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला होता. शिंदे यांच्या प्रशासकीय अकार्यक्षम कारभाराबाबत जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी  पुढील कार्यवाहीसाठी शिंदेचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांच्याकडे पाठवला होता. त्यांनी याची तात्काळ दखल घेवून साहेबराव शिंदे यांच्याकडील दोन्ही पदांचे पदभार काढण्याची कारवाई केली आहे.

आमदारांच्या तक्रारीची दखल 

गेल्या आठवड्यात कृषीसेवक न्यूज नेटवर्कने शिंदे यांचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आणला होता. तर आमदार अमोल जावळे व आमदार चंद्रकांत पाटील यांनीही याच अनुषंगाने शिंदेबाबत जिल्हा परिषदेच्या सिईओकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत शिंदे यांच्याकडील गटशिक्षणाधिकारी व शालेय पोषण आहार अधीक्षक या दोन्ही पदांचे पदभार काढण्यात आले आहेत. पंचायत समितीच्या आतापर्यंतच्या इतिहासात शिक्षण विभागातून पायउतार होण्याची नामुष्की ओढवली जाणारे शिंदे पहिले गटशिक्षणाधिकारी ठरले आहेत. दरम्यान, शिंदेच्या वसुलीचा कित्ता येथील स्वतःला पुढारी समजणाऱ्या एका केंद्रप्रमुखाने गिरवला होता. पदवीधर वेतन त्रुटी दुरुस्तीच्या नावाखाली या केंद्रप्रमुखाने एका शिक्षिकेकडून 50 हजार रुपयांची वसुली केली होती. मात्र याबाबतचे वृत्त येताच सदर शिक्षिकेकडून घेतलेले 50 हजार रुपये परत करण्याची नामुष्की या केंद्रप्रमुखावार आली होती. यावरून केंद्रप्रमुखांने लाच घेतल्याचे सिद्ध झाले असून याची दखल शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली आहे. वसुली प्रकरणात गटशिक्षणाधिकारी शिंदेची पहिली विकेट पडली असून आता पुढचा नंबर वसुलीबाज पुढारी असलेल्या केंद्रप्रमुखांचा आहे.