तहसीलदारांची अवैध गौण खनिज वाहतूकीविरुद्ध खिरवड-पातोंडी रस्त्यावर कारवाई : २ ट्रॅक्टर जप्त
दंडात्मक कारवाई
प्रतिनिधी /रावेर
अवैधरीत्या गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध महसूल प्रशासनाने कारवाईची धडक मोहीम अधिक तीव्र केली आहे. आज तहसीलदार दीपा जेधे यांनी पथकासह तालुक्यातील खिरवड ते पातोंडी फाट्यादरम्यान अवैध वाळूची (गौण खनिज) वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर पकडले आहेत. त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
तहसीलदार दीपा जेधे यांना खिरवड ते पातोंडी फाटा या मार्गावरून गौण खनिजाची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे तहसीलदारांनी स्वतः पथकासह सापळा रचला. या कारवाई दरम्यान विनापरवाना गौण खनिज वाहून नेणारे एमएच-19 एपी 8039 व एमएच 36 झेड 1630 या क्रमांकाचे दोन ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले असून, ते जप्त करून तहसील कार्यालय रावेरच्या आवारात जमा करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या 2 ट्रॅक्टरवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कारवाई पथकात तहसीलदार दीपा जेधे,अविनाश इंगोले,विश्वनाथ इंगळे,भूषण कांबळे व रवी शिंगणे यांचा समावेश होता.

krushisewak 
