गट शिक्षणाधिकाऱ्यांचा कारनामा : बातमी येताच बॅक डेटेड आरटीई समिती गठीत करण्याच्या हालचाली : सह्या करणारे झारीतले ते केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक कोण ?
शिंदेवर सोमवारनंतर कारवाई ?
प्रतिनिधी/रावेर
देशाचे भवितव्य घडवीणाऱ्या व पवित्र समजल्या जाणाऱ्या रावेर तालुक्यातील शिक्षण क्षेत्राला रावेरचे गटशिक्षणाधिकारी साहेबराव शिंदे यांनी "काळा डाग" लावला आहे. शिक्षकांकडून केल्या जाणाऱ्या सक्तीच्या आर्थिक वसुलीचे प्रकरण असह्य झाल्याने शिक्षकांनीच उजेडात आणले आहे. मात्र असे असतानाही या अधिकाऱ्याचे कारनामे थांबण्याचे नाव घेत नाहीत. आरटीई प्रवेशासाठी पडताळणी समिती गठीत करण्याच्या शासनाच्या आदेशाला शिंदे यांनी हरताळ फासला आहे. ही समिती गठीत न करता स्वतःच्या मार्जिप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबवत आहेत. याचा भंडाफोड शुक्रवारी कृषिसेवक न्यूज नेटवर्कने केल्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न शिंदे यांनी केला आहे. दोन केंद्रप्रमुख व दोन मुख्याध्यापकांना हाताशी धरून बॅक डेटेड समिती करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र त्यांची ही चलाखी पुन्हा उघडी पडली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेतली असून शिंदे यांच्यावर सोमवारनंतर कारवाई होण्याची अधिक शक्यता आहे.
शाळा तपासणीच्या नावाखाली रावेरचे गटशिक्षणाधिकारी साहेबराव शिंदे शिक्षकांकडून सक्तीची आर्थिक वसुली करीत असल्याच्या तक्रारी तालुक्यातील शिक्षकांनी केल्या आहेत. तसेच कार्यालयात अनुपस्थित राहणे, प्रशासकीय आकार्यक्षमता व नियोजनशून्य कारभार या कारणास्तव श्री शिंदे यांना बिडीओ विनोद मेढे यांनी गुरुवारी शोकॉज नोटीस बजावली आहे. खुलासा देण्यासाठी दिलेली तीन दिवसांची मुदत आज संपत आहे. सोमवारी कार्यालयीन वेळेत शिंदे त्यांचा खुलासा सादर करण्याची शक्यता आहे.
बॅकडेटेड समिती दाखवण्याचा कारनामा
आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी तालुकास्तरीय पडताळणी समिती गठीत करण्याचे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. मात्र शिंदे यांनी ही समिती गठीत न करता स्वतः च्या मार्जिप्रमाणे पंटरांना हाताशी धरून प्रवेश प्रक्रिया राबवत आहेत. याचे वृत्त शुक्रवारी प्रसिद्ध होताच शिंदे यांनी बॅक डेटेड समिती गठीत करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यांनी मार्जितील दोन केंद्रप्रमुख व दोन मुख्याध्यपाकांच्या यासाठी सह्या घेतल्या असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली. चौकशीचा फास स्वतःभोवती आवळाला जात असतांना शिंदे यांचे काळे कारनामे मात्र थांबत नसल्याचेच त्यांच्या हालचालीवरून दिसून येत आहे. दरम्यान बॅक डेटेड पडताळणी समिती गठीत करण्यासाठी सह्या करणारे झारीतले ते केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक कोण आहेत? याची तालुक्यातील शिक्षकांमध्ये चर्चा सुरु आहेत. आर्थिक लाभापोटी सह्या करणाऱ्या केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांची जिल्हा पातळीवरून चौकशी करण्याची मागणी पालकांनी केली आहे. गटशिक्षणाधिकारी शिंदे यांना वसुलीत सहकार्य करणारे याच विभागात कार्यरत असलेले "बगलबच्चे" आता चौकशीच्या रडारवर आहेत. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या सक्तीच्या आर्थिक पिळवणुकीमुळे त्रस्त झालेल्या शिक्षकांच्या या प्रश्नाचा कृषीसेवक न्यूज नेटवर्कने भांडाफोड केल्याने तालुकाभरातील शिक्षकांनी कृषीसेवक न्यूज नेटवर्कचे आभार मानले असून शिक्षण क्षेत्रात समाधान व्यक्त होत आहे.
सोमवारनंतर कारवाई शक्य ?
गटशिक्षणाधिकारी साहेबराव शिंदे यांच्या बाबतीत आमदार अमोल जावळे यांनी केलेल्या तक्रारीची व गेल्या तीन दिवसापासून प्रकाशित होणाऱ्या बातम्यांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांनी दखल घेतली आहे. शिंदे यांच्यावर सोमवारनंतर कारवाई होण्याची अधिक शक्यता शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

krushisewak 
